दीपक मोहिते,
निवडणूक विश्लेषण,
भाग क्र.१
आपला मतदार क्षणिक आर्थिक लाभात आनंद मानणारा…
विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहून सर्वसामान्य मतदार देखील चक्रावून गेले आहेत.हा जो निकाल लागला आहे,त्याला लाट म्हणता येणार नाही,तर त्सुनामीच म्हणावे लागेल.कारण या त्सुनामीने लोकशाही पद्धतीच्या राजकारणाचा पायाच मुळासकट उध्वस्त करून टाकला आहे.आजवर राज्याच्या इतिहासात अशाप्रकारचे राक्षसी बहुमत व विरोधकांचे शिरकाण कधीच पहायला मिळाले नाही.विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या लक्षात घेता,त्यांना साधे विरोधी पक्षनेतेपद मिळणे देखील दुरापास्त झाले आहे.
या वावटळीत अनेक जुने वृक्ष उन्मळून पडले.सत्ताधारी महायुतीने अशी कोणती जादू केली की मतदारांनी त्यांना भरभरून मते दिली.लाडक्या बहिणींना दरमहा १५००/- रु.देण्याची योजना फलदायी ठरली का ? २ कोटी लाभार्थी महिलांनी महायुतीला मतदान केले का ? असे एक ना अनेक प्रश्नांनी तुमच्या आमच्या मस्तकात थैमान घातले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ३८ % मतदान झाले होते,या निवडणुकीत ते ४९ % वर गेले आहे.लाडक्या बहिणीची ही करामत असावी,असे प्रथमदर्शनी वाटते.तस झाले असेल तर ते अत्यंत घातक आहे.लोकशाही व्यवस्थेत आमिषे दाखवून त्याला आपलेसे करणे,हे कायद्याने गुन्हा आहे.त्यास अशा पद्धतीने राजमान्यता मिळू लागली,तर सत्तेत येणारा प्रत्येक पक्ष,असा अनुचित प्रकार करेल.मतदारांना खरेदी करण्याचा हा नवीन फंडा भाजपने सुरू केला आहे.मध्यप्रदेशात या फंडाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्या तोच फंडा भाजपने महाराष्ट्रात तर झारखंड मुक्ती मोर्चाने झारखंड राज्यात राबवला.त्यांनीही या निवडणुकीत प्रचंड यश मिळवले.
या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी पक्षाने अनेक गैरप्रकार केले.पैसेवाटप हा कळीचा मुद्दा ठरला.राज्याच्या अनेक भागात हजारो कोटी रु.पकडण्यात आले.केंद्रीय निवडणूक आयोग,असे गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी नाके उभारत असते,तसेच भरारी पथके नेमत असते,असा कडेकोट बंदोबस्त असताना भल्यामोठ्या रकमा येतात कशा ? हा पैसा येतो कोठून ? प्रचंड धाडस करून या व रकमा पाठवतो कोण ? या सर्व प्रश्नांचा उलगडा होण्याची गरज आहे.निवडणूक व पैसेवाटप,हे आता आपल्या पाचवीलाच पुजले आहे.या निवडणुकीच्या निकालावरून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा कार्यान्वित झाला आहे.” एक देश,एक निवडणूक,” संघराज्यात प्रादेशिक पक्षाचा नायनाट व लहान जिल्हे,असा त्यांचा वर्षानुवर्षे अजेंडा आहे.या अजेंडाला आता वेगाने चालना मिळण्याची शक्यता आहे.या निवडणुकीमध्ये वाढती महागाई,भ्रष्ट कारभार,धनदांडग्यांना कर्जमाफी,शेतीची दुरावस्था, कायदा व सुव्यवस्थेची ढासळती स्थिती इ.महत्वाचे प्रश्न मागे पडले.केवळ ” लाडक्या बहिणींना दरमहा १५००/- रु.देणे,” ही योजना महायुतीसाठी फायदेशीर ठरली.आज विधानसभेला विरोधी पक्षनेता देखील मिळणार नाही.कोणतेही विधेयक विधानसभेच्या पटलावर आले,तर ते सहजरित्या संमत होणार आहे.हे सारे अत्यंत धोकादायक असून लोकशाहीचा गळा घोटणारे आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर असे कधीही घडले नाही.मात्र भविष्यात भाजप दुसरी खेळी खेळू शकते.भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत.भविष्यात शिंदे व पवार गटाशी भाजपचे मतभेद झाले तर त्यांना स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी केवळ १३ आमदाराची गरज आहे.त्यांनी जे शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याशी केले ते या दोघांशीही करू शकतात.त्यामुळे या विजयाने एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनी हुरळून जाऊ नये.या निवडणुकीच्या निकालावरून एक मात्र स्पष्ट झाले आहे.आपल्या मतदाराला आर्थिक लाभाचे आमिष दाखवले तर तो सारासार विचार बाजूला सारतो व क्षणिक सुखात आनंद मानतो,हे खरे ठरले आहे.
क्रमशः

