दीपक मोहिते,
” न्यूजलाइन,”
सर्व्हे पोल हे एक थोतांड असून व “अशी ही बनवाबनवी,” चा प्रयोग असतो,
निवडणुकीचे अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थांचे गेल्या दोन दिवसापासून अक्षरशः पीक आले आहे.काही संस्था या राजकीय पक्षाकडून मलिदा घेऊन आपले अंदाज व्यक्त करत असतात.या संस्थांपैकी अनेक संस्था,विविध वृत्तसंस्थाशी संबंधित असतात व या सर्व संस्था संबंधित राजकीय पक्षांना अनुकूल ठरतील,असे अंदाज व्यक्त करतात,असा आजवरचा अनुभव आहे.त्याबदल्यात या संस्थांना काय मिळते ? असा प्रश्न साहजिकच तुमच्या आमच्या मनात उभा राहतो.त्यांच्या या अंदाजाला काडीचाही आधार नसतो,पण मतदारांच्या मनात गोंधळ उडवून देणे,असा उद्देश असतो.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या संस्थानी सर्व्हे पोल जाहीर केले,ते तद्दन खोटे ठरले.त्यामुळे अशा संस्थांच्या सर्व्हे पोलवर आपण किती विश्वास ठेवायचा,हे आपण ठरवायचे असते.
या संस्थांच्या दाव्यानुसार त्यांचे कर्मचारी हे मतदानाच्या दिवशी मतदानकेंद्रावर मतदान करून येणाऱ्या मतदारांना गाठतात व त्यांच्या प्रतिक्रिया घेतात.पण या दाव्यात किंचितही तथ्य नाही.कारण मतदार हा कधीही आपले मत कोणाला दिले,याविषयी थांगपत्ता लागू देत नाही.मतदानाच्या दिवशी पोलिस,उमेदवार व पोलिंग एजंट या दोघांव्यतिरिक्त कोणालाही १०० फूट अंतरांत उभे राहू देत नाहीत.या संस्थांचे अधिकारी व कर्मचारी हे वातानुकूलित कार्यालयात बसून बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेत,हे सर्व्हे पोल तयार करत असतात.गेल्या लोकसभा निवडणुकीत या साऱ्या संस्था उताण्या पडल्या होत्या.वास्तविक केंद्रीय निवडणूक आयोगाने या अशा फसवाफसवी करणाऱ्या सर्व्हे पोलवर बंदी आणली पाहिजे.लोकांच्या मनात काय आहे ? त्यांचे मत कोणाला ? हे कुणीच सांगू शकत नाही.हे आता लोकांनाही कळून चुकले आहे.त्यामुळे लोक अशा सर्व्हे पोलकडे ढुंकूनही पाहत नाहीत.वृत्तवाहिनीवर हे सर्व्हे पोल जाहीर करण्यात येत असतात,त्यांनाही त्याबदल्यात चांगला आर्थिक लाभ होत असतो.कारण हल्ली ” सबकुछ बिकता है,” हे फार जोमात आहे.

