दीपक मोहिते,
प्रचंड मताधिक्य घेऊन आम्ही दोघे विजयी होऊ,आमचा विजय ” न भूतो,न भविष्यती,” असा असेल – आ हितेंद्र ठाकूर,
राज्यात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.जवळपास सर्वच उमेदवारांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होत आली आहे.पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार त्याला अपवाद नाहीत.कडक उन्हात व घामाच्या धारांनी ओथंबून जात,प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठभेठी घेत आहेत.१८ नोव्हें.सायंकाळी ५.०० वाजता प्रचाराचा धुरळा खाली बसणार असून २० नोव्हेंबर रोजी २९ लाख मतदार त्यांच्या नशिबाचा फैसला करतील.या निवडणुकीच्या निमित्ताने news 27.in media, हे नावाजलेले वेबपोर्टल काही उमेदवारांच्या मुलाखती प्रसिद्ध करत आहेत.या उमेदवारांनी आमदार म्हणून केलेली विकासकामे तसेच प्रस्तावित विकासकामांची माहिती त्यांच्याकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.सर्वप्रथम गेली ३५ वर्षे एक यशस्वी आमदार म्हणून राज्यभरात प्रसिद्धीला आलेले आ.हितेंद्र ठाकूर यांच्याशी आपण आज बोलणार आहोत.
प्रतिनिधी – गेल्या सहा विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर आता सातव्यांदा तुम्ही रिंगणात आहात,तुमच्या या यशस्वी वाटचालविषयी काय सांगाल ?
आ.ठाकूर – लोकांचे प्रेम व माझ्या कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत,या बळावर मी हे शक्य करू शकलो.लोकांचे प्रचंड प्रेम,त्याला कार्यकर्त्यांच्या मेहनतीची जोड,यामुळे मी प्रत्येक निवडणूक वाढत्या मताधिक्याने जिंकू शकलो.म्हणून मी नेहमी म्हणतो की माझा पराभव हा विरोधी पक्ष करू शकत नाही,माझा कार्यकर्ता थकला तरच मी पराभूत होऊ शकतो,आणि माझा कार्यकर्ता कधीच थकत नाही.त्यांच्या अपार मेहनतीमध्ये माझे यश दडले आहे.माझ्या यशस्वी राजकीय वाटचालीत कार्यकर्त्यांचे फार मोठे योगदान आहे.
प्रतिनिधी – यशाचे गमक तुम्ही सांगितले,आता गेल्या पस्तीस वर्षात केलेल्या विकासकामासंदर्भात सांगा,
आ.ठाकूर – १९८०-९० च्या दशकात वसई – विरार उपप्रदेशात नागरीकरणाला वेग आला.मुंबई शहरातील घरांचे किमती आकाशाला भिडल्या व सर्वसामान्य जनता वसई,विरार व डोंबिवली – कल्याण,अंबरनाथ ते थेट बदलापुर परिसरात स्थलांतरित होऊ लागले.त्याकाळी वसई तालुक्यात चार नगरपरिषदा कार्यरत होत्या,त्यांच्यावर या वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणाचा प्रचंड परिणाम होत गेला.वाढत्या लोकसंख्येच्या या
उपप्रदेशाला नागरी सुविधा देताना त्यांची प्रचंड दमछाक झाली.त्याकाळी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केले होते.त्याच दरम्यान राज्यसरकारने या
उपप्रदेशाचा सर्वांगीण व नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आमच्या उरावर सिडको प्राधिकरण लादले.या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वसई अक्षरशः लुटून खाल्ली.लोकांचा प्रचंड विरोध सुरू झाला.कारण या सिडकोने अनधिकृत बांधकामाना खतपाणी घातले व वसईचा विकास करण्या ऐवजी वसई भकास झाली.कालांतराने सिडकोने आपला गाशा गुंडाळला.अशा बिकट प्रसंगी मी माझ्या एक मताच्या जोरावर आघाडी सरकारकडून सूर्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळवला व प्रकल्पाचे काम मार्गी लागले.२००२ साली सूर्या प्रकल्प टप्पा -१ मधून पाणी मिळू लागले.लोकाना काही अंशी दिलासा मिळाला.त्यानंतर टप्पा – २ साठी मी प्रयत्न सुरू केले,अनेक अडचणींवर मात करत,या टप्प्यातून आता पाणी सुरू झाले आहे.अधिकारी व माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी पाणीटंचाईचा भीषण प्रश्न मार्गी लावू शकलो.विजेच्या समस्या,रस्ते,रोजगार
उद्योगधंदे वाढ,शिक्षण,आरोग्य व सामाजिक सलोखा इ.क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले.विकासाच्या बाबतीत असलेला मागासलेपणा नाहीसा होऊन वसईची वाटचाल आता तिसऱ्या मुंबईच्या दिशेने सुरू झाली आहे,याचा मला सार्थ अभिमान आहे.
प्रतिनिधी – तालुक्याचा असा विकास झाला असताना विरोधक विकास झाला नाही, असा दावा करतात,तो कशासाठी ?
आ.ठाकूर – विरोधकांनी जर अशी ओरड केली नाही तर त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही.विरोधक म्हणून ओरडत राहणे,हे त्यांचे कामच आहे.कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नसल्यामुळे त्यांना ओरड करणे भागच आहे.त्यांनी ओरड केली नाही तर त्यांना विचारणार कोण ? त्यामुळे हे स्वाभाविक आहे.त्यांच्या या अशा वागण्याचा आम्हाला बिलकुल त्रास होत नाही,आणि आम्ही फारशी दखलही घेत नाही.कारण माझा फोकस हा विकासकामावर असतो,त्यामुळे मी त्यांच्या टीकेला उत्तर देत बसत नाही.आज मतदारसंघात आरोग्य,शिक्षण,रोजगार क्षेत्रात अनेक विकासकामे मार्गी लावली.जी काही कामे सुरू आहेत,तीही लवकरात लवकर पूर्ण होतील,अशी अपेक्षा आहे.वाढते नागरीकरण व प्राप्त होणारा आर्थिक निधी,याचा मेळ बसवताना शासकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.सरकारी अनुदाने वेळेवर मिळत नाहीत.आपल्याला सारं काही करता येते,पण पैश्याचे सोंग करता येत नाही.तरीही रो रो सेवा,मेट्रो विस्तारीकरण व अन्य विकासकामे आम्ही मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहोत.
प्रतिनिधी – शेवटचा प्रश्न,या निवडणुकीच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ?
आ.ठाकूर – मी व माझा मुलगा आ.क्षितिज ठाकूर आजवर झालेल्या विजयापेक्षा यंदाचा आमचा विजय नेत्रदीपक तसेच रेकॉर्डब्रेक मताधिक्य घेणारा असेल.मी सातव्यांदा तर क्षितिज चौथ्यांदा बाजी मारेल.निकालानंतर आपण पुन्हा भेटू.

