दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मोठ्या रकमा पाठवणाऱ्या लोकांची नावे कळायला हवीत,
गेल्या चार ते पाच दिवसात वसई विधानसभा मतदारसंघात सुमारे तीन ते चार कोटी रु.रोख रक्कम पकडण्यात आली.ही रक्कम कोणाची आहे,हे येथील मतदारांना कळले पाहिजे.कारण तो त्यांचा अधिकार आहे.गेल्या आठवडाभरात पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे सात ते आठ कोटी रु.जप्त करण्यात आले.या रकमा पाठवणारे कोण ? ते कोणत्या उमेदवारासाठी पाठवण्यात आले ? ते
स्विकारणारे कोण ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मतदारांना कळायला हवीत.
केंद्रीय निवडणूक आयोग हा पारदर्शक व्यवहार करतो,असा गाजावाजा सतत होत असतो.त्यामुळे आयोगाने या सर्वांची नावे जाहीर करणे,आवश्यक ठरते.हे पैसे कोण पाठवते,हे न कळण्याइतके येथील मतदार दुधखुळे नाहीत.गेल्या लोकसभा निवडणुकीत हा खेळ मोठ्याप्रमाणात झाला होता.त्याचे दृष्यपरिणाम पालघरच्या मतदारांना पाहायला मिळाले होते.त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत होत आहे.त्यामुळे आयोगाने या देशद्रोही चेहऱ्यांना उजेडात आणण्याची गरज आहे.पण आयोग तसे करेल,असे वाटत नाही,कारण गेल्या अकरा वर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पार रसातळाला गेली आहे.वसई व नालासोपारा मतदारसंघावर आ.हितेंद्र ठाकूर यांचे निर्विवाद वर्चस्व आहे,त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून पराभूत करता येत नाही,त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या एका राजकीय पक्षाने हा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे.सहा वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत एका राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गाडीतील भलीमोठी रक्कम पोलिसांनी जप्त केली होती.मात्र हे असे दळभद्री फंडे वापरूनही या नतद्रष्ट मंडळी आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर यांना रोखू शकणार नाहीत.पण सतत पकडण्यात येणाऱ्या रकमा लक्षात घेऊन आयोगांचे अधिकारी व स्थानिक पोलिसांनी शहरात येणाऱ्या मार्गावर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहनाची कडक तपासणी केली पाहिजे.सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनाची तपासणी जरुर करा,पण हे समाजकंटक मात्र मोकळे सुटता कामा नयेत.

