दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
या निवडणुकीसंदर्भात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह,
पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सुमारे २२ लाख ९२ हजार ६६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.एकूण मतदारांपैकी ११ लाख ८७ हजार ५८९ पुरुष तर ११ लाख ४ हजार २४६ महिला व २३१ तृतीय पंथीय मतदार आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये दोन लाख मतदार वाढले आहेत.१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६ लाख ८ हजार ५२६ मतदार आहेत,तर १३० पालघर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी २ लाख ९८ हजार ५७९ मतदार असून हा मतदारसंघ अनु.जमातीसाठी आरक्षित आहे.या व्यतिरिक्त १२८ डहाणू ( अनु.ज.) -३ लाख १ हजार २३९,१२९ विक्रमगड ( अनु.ज.)-३ लाख १७ हजार ७४१,१३१ बोईसर ( अनु.ज.)- ४ लाख ११ हजार ३२९,१३३ वसई ( सर्वसाधारण )- ३ लाख ५४ हजार ६५२ असे एकूण २२ लाख ९२ हजार ६६ मतदार आहेत.डहाणू,विक्रमगड व पालघर,या तीन विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषापेक्षा अधिक आहे.
कालपासून सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.कडक उन्हात,घामाच्या धारा वाहत असताना उमेदवार व त्यांचे सहकारी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यावर भर देत आहेत.पायी चालत पाड्यापाड्यावर जाऊन पाड्यावर राहणाऱ्या कुटुंबाची ते भेट घेत आहेत.पण अवघ्या दहा दिवसांत ते सरासरी तीन ते साडेतीन लाख मतदारांना भेटणे अशक्य असल्यामुळे चौकसभा,गावभेटी,रॅली व मतदारसंघाच्या मुख्य ठिकाणी एखादी जाहीर सभा,असा कार्यक्रम आखतील.या निवडणुकीत मतदारांना देखील खूप उत्सुकता असून यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

