दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
जरांगे पाटील यांचा वैचारिक गोंधळ उडाला आहे,
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सध्या वैचारिक गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे.गेल्या तीन महिन्यापासून ते मराठा समाज,विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार व मराठा आरक्षण विरोधात असलेल्या उमेदवारांना पाडणार,असे सांगत होते.पण काल त्यांनी अचानक घुमजाव करत निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय रद्द केला.जरांगे पाटील यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे मराठा समाजात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
निवडणूक लढण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर त्यांनी आता रिंगणात असलेल्या इतर पक्षाच्या उमेदवारांकडून,” आपला मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे,” असे लिहून घ्यायचे ठरवले आहे.जो उमेदवार असे लिहून देईल,त्याला आपण पाडायचं नाही,असे जाहीर केले आहे.हा एकप्रकारे वैचारिक गोंधळ असून अशा धरसोड वृत्तीमुळे आगामी काळात मराठा समाज बिथरण्याची शक्यता आहे.गेल्या पंधरा दिवसापासून जरांगे पाटील यांनी अनेकांच्या मुलाखती घेतल्या,त्यांना जागावाटप केले,व अचानक काल दुपारी त्यांनी निवडणुका लढणार नाही,अशी भूमिका घेतली.आता ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत,त्यांनी ते मागे घ्यावेत,असे आवाहन केले आहे.जर कोणी उमेदवारी मागे घेतली नाही तर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.या इशाऱ्याला धूप न घालता अनेक मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उभे आहेत.जरांगे पाटील हे आपली भूमिका वारंवार बदलत असल्यामुळे मराठा समाजही आता वैफल्यग्रस्त झाला आहे.समाजाला आरक्षण मिळवून देता देता जरांगे पाटील हे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भाषा करू लागले,तेंव्हाच मराठा आरक्षणाचा प्रश्न अडगळीत पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते.जरांगे पाटील यांच्या निवडणूक न लढण्याच्या निर्णयाचे सर्वच पक्षांनी स्वागत केले आहे.
निवडणुकीत राजकीय पक्षाचे उमेदवार पाडून समाजाला कदापि आरक्षण मिळू शकणार नाही.कारण हे आरक्षण देणे,ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते,त्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची गरज आहे.आरक्षणाची मर्यादा वाढवणे,हे केवळ संसदेच्या पटलावरच होऊ शकते.ओबीसीमधून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देणे,ही वेगळी बाब आहे,ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत,त्यांना सरकारने प्रमाणपत्रे दिली.मात्र त्यास ओबीसी समाजाचा कडाडून विरोध होत आहे.त्यामुळे सरकार,राज्यात मोठ्यासंख्येने असलेल्या ओबीसी समाजाला दुखवणार नाही.रस्त्यावर आंदोलने,उपोषण करून किंवा निवडणुका लढवून हा प्रश्न सुटणारा नाही.आरक्षणाच्या प्रश्नावर कायदेशीर लढाई हाच एकमेव पर्याय आहे.पण जरांगे पाटील ते न करता सतत आंदोलने,उपोषणे करणे,निवडणूक लढवणे व माघार घेणे,असे प्रकार सतत करत सुटले आहेत.अशा दिशाहीन धोरणामुळे तसेच धरसोडवृत्तीमुळे त्यांचा वैचारिक गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे.

