दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
सर्वत्र बंडखोरीची लागण,
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकून महायुतीच्या तोंडाला चांगलाच फेस आणला होता.त्याचीच पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोघांना बंडखोरीचा त्रास झाला नव्हता,पण यावेळी मात्र दोघांना बंडखोरांनी अक्षरशः जेरीस आणले आहे.बंडखोरांची समजूत काढताना वरिष्ठ नेत्यांची प्रचंड दमछाक होत आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात बंडखोरांनी रणशिंग फुंकल्यामुळे शरद पवार यांना इंदापुरात दाखल व्हावे लागले आहे.तर बोरिवली येथे माजी.खासदार गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करत भाजपची अवस्था बिकट केली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी व शाह जोडीने गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून पियुष गोयल याना उमेदवारी दिली.त्यामुळे शेट्टी प्रचंड नाराज झाले होते.त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली होती.विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ असे आश्वासन देण्यात आले होते.ते पाळले गेले नाही,त्यामुळे त्यांनी बंड पुकारले आहे.शेट्टी यांची लोकप्रियता व लोकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता भाजपचे धाबे दणाणले आहे.देवेंद्र फडणवीस त्यांची सतत मनधरणी करत आहेत.पण शेट्टी ऐकायला तयार नाहीत.ठाणे येथेही भाजपचे संजय केळकर यांचे आम्ही काम करणार नाही,असे एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे केळकर यांना ही निवडणूक जिंकणे अशक्य झाले आहे.सांगली लोकसभा मतदारसंघातील अनेक विधानसभा जागांवर झालेली बंडखोरी महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणारी ठरली आहे.पालघर विधानसभा मतदारसंघात भाजपचे अमित घोडा यांनीही एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याविरोधात बंड केले असून ते सध्या नॉट रीचेबल झाले आहेत.तसेच विद्यमान आ.श्रीनिवास वनगा यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे धायमोकलुन रडत आपले घर सोडले होते.बोईसर विधानसभा मतदारसंघातही आपल्याच उमेदवाराविरोधात शिंदे गटाचे जगदीश धोडी यांनी दंड थोपटले आहेत.विक्रमगड विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम हे भाजपच्या हरिश्चंद्र भोये यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.निकम हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.आजच्या घडीला राज्यात महाविकास आघाडी व महायुतीचे प्रत्येकी २० ते २५ बंडखोर रिंगणात आहेत.आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे.किती बंडखोर आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे.

