दीपक मोहिते,
वास्तव,
बोईसर येथे विलास तरे व राजेश पाटील यांच्यामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीचा सामना..
१३१ बोईसर विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेना ( उबाठा ),शिवसेना ( एकनाथ शिंदे ) बहुजन विकास आघाडी या तिघांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.भाजपने या मतदारसंघात स्वतःचा शिलेदार माजी आ.विलास तरे याना एकनाथ शिंदे गटातून उमेदवारी मिळवून दिली आहे.तर वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांची साथ सोडून आपल्या मनगटावर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेणाऱ्या डॉ.विश्वास वळवी यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे.हे दोन्ही उमेदवार बलाढ्य असे असून बविआचे विद्यमान आ.राजेश पाटील यांची त्यांच्याशी लढत होत आहे.या तिघांपैकी बोईसर पश्चिम भागात जो उमेदवार सर्वाधिक मते घेईल,तोच सिकंदर ठरणार आहे.सालवड,पास्थळ सरावली,एमआयडीसी,
तारापूर,बेटेगाव,खैराफाटा,पाम,कुडण व अन्य काही गावात जो उमेदवार एकगठ्ठा मतदान मिळवणार तोच बाजी मारेल,असे बोईसरवासीयांचे म्हणणे आहे.दुसरीकडे वालीव,सातीवली पेल्हार, बिलालपाडा,संतोष भुवन,धानिव व धानिव बाग,या वसई तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना कंबर कसून काम करावे लागणार आहे.या सर्व भागात बहुजन विकास आघाडीचे आजवर निर्विवाद वर्चस्व राहिले.त्यामुळे ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या गटाचे डॉ.विश्वास वळवी व एकनाथ शिंदे गटाचे विलास तरे या दोघांना फार मोठे आव्हान ठरणारे आहे.वसई पट्ट्यात या दोन्ही गटाची ताकद अगदी नगण्य आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आ.राजेश पाटील यांना या पट्ट्यातील मतदारांनी साथ दिल्यामुळे त्यांना शेवटच्या टप्प्यात विलास तरे यांच्यावर निसटता विजय मिळवता आला होता.पण या निवडणुकीत भाजपने विलास तरे याना एकनाथ शिंदे गटातून उमेदवारी दिल्यामुळे उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गटात मतविभागणी होईल,अशी शक्यता वाटत नाही.त्यामुळे तिन्ही उमेदवारांना विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत एकमेकांशी संघर्ष करावा लागणार आहे.उद्धव ठाकरे गटाचे डॉ.विश्वास वळवी हे बाहेरचे उमेदवार असल्यामुळे तसेच या मतदारसंघात त्यांचे अनेक पदाधिकारी हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे त्यांची बाजू कमकुवत झाली आहे.भाजपने केलेल्या खेळीमुळे विलास तरे व राजेश पाटील या दोघांमध्ये शेवटपर्यंत विजयासाठी जोरदार संघर्ष होईल,असा अंदाज आहे.

