दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
शिट्टी चिन्हाचा घोळ ; उद्या न्यायालयात निर्णय होण्याची शक्यता,
निवडणुकीच्या आखाड्यात आ.हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीशी दोन हात करणे,शक्य होत नसल्यामुळे विरोधक पडद्याआडून अनेक कटकारस्थाने करत असतात.बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे त्यांचे पारंपरिक चिन्ह मिळू नये,यासाठी त्यांनी जे प्रयत्न चालवले आहेत,त्याला बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.बहुजन विकास आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
यापूर्वी २०१८ साली झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही त्यावेळी सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांनी रात्रभर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बविआला शिट्टी हे चिन्ह मिळू दिले नव्हते.त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत झाली आहे.त्यावेळी बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांना रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती.यंदाही विरोधकांनी अशाचप्रकारचा डाव रचला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी हे चिन्ह संयुक्त जनता दल या पक्षासाठी राखीव ठेवल्यामुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आयोगाने बविआला हे चिन्ह बहाल केले होते.तसेच बविआने आजवर झालेल्या अनेक निवडणुका याच चिन्हावर लढवल्या असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने हे चिन्ह संयुक्त जनता दलासाठी राखीव ठेवण्याचे कारण न पटणारे आहे.त्यामुळे बविआने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली आहे.न्यायालयानेही बविआच्या याचिकेची दखल घेऊन उद्या त्यावर सुनावणी ठेवली आहे.या सुनावणीत न्यायालय कसा निर्णय देते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

