दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आ.हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय खेळीकडे तमाम राजकीय पक्षाचे लक्ष,
पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या राजकारणाला लवकरच वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे.बहुजन विकास आघाडीने सहा विधानसभा मतदारसंघात उभे केल्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.डहाणू विधानसभा मतदारसंघात उभे असलेले कॉम्रेड आ.विनोद निकोले व विक्रमगड येथे उभे असलेले सुनील भुसारा हे दोघेही आ.हितेंद्र ठाकूर यांचे जिवलग मित्र असतानाही त्यांच्यासमोर आ.ठाकूर यांनी उमेदवार उभे केल्यामुळे आ.ठाकूर यांच्या मनात नेमके काय चालले आहे ? याविषयी पालघर जिल्ह्यात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
तसेच १३२ नालासोपारा व १३३ वसई विधानसभा मतदारसंघात देखील आ.हितेंद्र ठाकूर वेगळी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत.आ.ठाकूर जी राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत,ती लक्षात घेता जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे.आ.ठाकूर यांच्या मनात नक्की काय चाललंय याचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये प्रचंड चलबिचल निर्माण झाली आहे.पालघर विधानसभा मतदारसंघात भाजपचे अमित घोडा यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यांना पालघर विधानसभा मतदारसंघात बविआचे उमेदवार म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता आहेत.दरम्यान अमित घोडा हे गेल्या आठ तासापासून नॉट रीचेबल झाले आहेत.बविआतर्फे डहाणू येथे अरुण शंकर निकोले,विक्रमगड येथे एकनाथ पांडू दरोडा,पालघर येथे अशोक माधव भोईर,यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.एकूण सहा मतदारसंघांपैकी वसई,नालासोपारा,पालघर व बोईसर हे चार मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकायचेच,अशी रणनिती बविआने आखली आहे.वसई व नालासोपारा मतदारसंघात आ.ठाकूर कोणती राजकीय खेळी करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

