दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
या निवडणुकीत मनसे महायुतीची ” बी,” टीम,
मनसेचे राजे,राज ठाकरे हे सतत भूमिका बदलणारे नेते म्हणून ओळखले जातात.गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला व मुंबई,ठाणे,नाशिक व पुणे या चार महानगरात युतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतल्या होत्या.त्यावेळी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते.पण त्यांचा तो पाठिंबा बिनशर्त नव्हता,हे आता महाराष्ट्राच्या जनतेला जाणवू लागले आहे.त्यांनी या निवडणुकीत सुमारे १५० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.त्यापैकी किती जागा निवडून येतील,हे सांगणे अवघड आहे.पण त्यांनी काल मनसे सत्तेत येईल व देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील,असे भाकीत केले पण त्यांचे हे भाकीत खरे ठरण्याची शक्यता फार कमी आहे.मात्र त्यांच्या या वक्तव्याने मनसे ही भाजपची ” बी,” टीम आहे,यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.
त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या जनतेला बिलकुल आश्चर्य वाटले नाही.कारण राज ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची वाटचाल ही कायम तिरकस अशीच राहीली आहे.त्यांच्या बोलण्यात व करण्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो.जाहीररित्या खूप काही बोलत असतात,पण त्याचवेळी ते पडद्यामागे वेगळेच वागत असतात.या निवडणुकीत त्यांनी आपला मुलगा अमित ठाकरे याला माहीम विधानसभा मतदारसंघात उभे केले आहे.हा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला गेला आहे.त्यांचे सदा सरवणकर यांचा हा मतदारसंघ,येथून ते दोन वेळा निवडून आले आहेत.त्यांचा या विधानसभा मतदारसंघात चांगलाच दबदबा आहे.या मतदारसंघावर अविभक्त शिवसेनेचे कायम वर्चस्व राहिले होते.दोन वर्षापूर्वी शिंदे यांनी केलेल्या बंडात सदा सरवणकर हे शिंदे गटात सामील झाले.एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या सदा सरवणकर याना शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद व आता माहीम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.आता सरवणकर यांनी रिंगणातून माघार घ्यावी,यासाठी भाजपचे पहिल्या फळीतील नेते हात धुवून त्यांच्यामागे लागले आहेत.पण सदा सरवणकर काही त्यांना धूप घालत नाहीत.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ते मान्य नाही.ते या विषयावर तोंडातून चकार शब्द बाहेर काढत नाहीत.त्यांनी या विषयावर बाळगलेले मौन हे सरवणकर यांना पाठिंबा देणारे आहे,हे स्पष्ट होत आहे.या निवडणुकीत भाजपने एकनाथ शिंदे व पवार या दोन्ही गटाचे अतिशय पद्धतशीरपणे खच्चीकरण केले आहे.भाजपने पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी वसई,नालासोपारा,
विक्रमगड व डहाणू हे चार मतदारसंघ स्वतःकडे राखले.पालघर व बोईसर हे दोन मतदारसंघ नावापुरते शिंदे गटाला दिले व या दोन्ही मतदारसंघात त्यांनी राजेंद्र गावित व विलास तरे या आपल्या दोन माणसांना त्यांच्या गटात पाठवले व त्या दोघांना उमेदवारी मिळवून दिली आहे.अशाप्रकारे भाजपने शिंदे गटाचा सहाही मतदारसंघात सुपडा साफ केला.भाजपने असे अनेक प्रकार अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील आमदाराच्या मतदारसंघात केले.त्यामुळे एकनाथ शिंदे हे माहीमच्या प्रकरणात मौन बाळगून आहेत.भाजपची बोंबाबोंब गॅंग ( आशिष शेलार व अन्य ) ही गेल्या दोन दिवसांपासून आपण मनसेला कशी मदत केली पाहिजे,त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता,त्यामुळे त्यांना आपण मदत करणे,हे आपले कर्तव्य आहे,असे पालुपद लावले आहे.या सर्व घडामोडीवरून मनसेने आपण महायुतीची ” बी,” टीम असल्याचे अप्रत्यक्षरीत्या दाखवून दिले आहे.२०१९ च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर अशाच प्रकारचा आरोप झाला होता.त्यावेळी वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसचे दहा ते बारा उमेदवार पराभूत झाले होते.या निवडणुकीत मुंबई,ठाणे,पुणे व नाशिक या चार महानगरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अपशकुन करण्यासाठी राज ठाकरे व भाजपने ही खेळी खेळली आहे.पण त्यांना या खेळीत यश मिळेल,असे वाटत नाही.

