दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
१३० पालघर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता,
१३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना ( उबाठा )शिवसेना ( शिंदे गट ) व बविआ अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.या विधानसभा मतदारसंघात एकूण १० उमेदवारांनी १३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.माजी खा.राजेंद्र गावित यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
येत्या ४ नोव्हें.रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.शिवसेना ( उबाठा ) तर्फे जयेंद्र किसन दुबळा तर राजेंद्र गावित हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून रिंगणात आहेत.बहुजन विकास आघाडीही या मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे.त्यांच्याकडून माजी आ.अमित घोडा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.त्यांना उमेदवारी मिळाल्यास मात्र येथील लढत अधिक रंगतदार होईल,असा अंदाज आहे.अमित घोडा जर रिंगणात उतरले तर त्यांचा फटका शिवसेनेच्या दोन्ही गटांना बसू शकतो.राजेंद्र गावित यांच्याविषयी पालघरकरामध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे.राजकीय स्वार्थासाठी त्यांनी गेल्या सहा वर्षात काँगेस,भाजप,शिवसेना,
भाजप,शिवसेना पुन्हा भाजप व आता पुन्हा शिवसेना ( शिंदे गट ) असा प्रवास केला.त्यांचा हा प्रवास येथील मतदारांच्या मनाला पटलेला नाही.त्यामुळे ते वेगळा विचार करण्याच्या मनस्थितीत आहेत.दुसरीकडे हा तालुका एकेकाळी एकसंघ शिवसेनेचा गड होता.२००९ साली तो काँग्रेसने जिंकला.हा एकमेव अपवाद वगळता या मतदारसंघावर एकसंघ शिवसेनेचे कायम वर्चस्व राहिले.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकसंघ शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले,पण कट्टर शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे सोबत राहिले.गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली असली तरी या विधानसभा निवडणुकीत तसे घडणार नाही.कारण भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याविषयी पालघरकरात प्रचंड नाराजी आहे.मात्र उद्धव ठाकरे यांनी दिलेला उमेदवार जयेंद्र दुबळा हे गावित यांच्या तुलनेत कमकुवत असल्यामुळे गावित यांना पुन्हा लॉटरी लागू शकते.पण बविआतर्फे जर अमित घोडा यांना उमेदवारी मिळाल्यास ही लढत अधिक रोमहर्षक होईल,अशी शक्यता आहे.अमित घोडा यांनी जर २५ हजाराच्या घरात मते मिळवली तर राजेंद्र गावित हे नक्कीच अडचणीत येऊ शकतात.या मतदारसंघात एकूण २ लाख ९५ हजार ५१ मतदार आहेत.या मतदारसंघात सरासरी ६४ ते ६९ % मतदान होत असते.गेल्या लोकसभा निवडणुकीत ७०% मतदान झाले होते.

