दीपक मोहिते,
सहा विधानसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवारी अर्ज दाखल,
काल दिवसभर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू होती.तशीच धावपळ आज अखेरच्या दिवशी सुरू राहणार आहे.कालपर्यंत एकूण २७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
कालपर्यंत १२८ डहाणू-०४,१२९ विक्रमगड-१०,१३० पालघर-०३,१३१ बोईसर-०२,१३२नालासोपारा-०५ व १३३ वसई-०३,असे एकूण २७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यमान आ.विनोद निकोले,आ.सुनील भुसारा,आ.राजेश पाटील,आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर,यांचा समावेश आहे.या सहापैकी जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे.भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) शिवसेना ( उबाठा ) या पक्षांच्या नाराजांचा त्यामध्ये समावेश आहे.१३० पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी माजी खा.राजेंद्र गावित याना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काल दिवसभर ते तणावाखाली होते.माध्यमांशी बोलताना ते व त्यांच्या पत्नी अक्षरशः धायमोकलून रडत होते.त्यानंतर त्यांनी काही तासापूर्वी आपले घर सोडले,त्यांचा मोबाईल सध्या नॉट रीचेबल असल्यामुळे आई व पत्नी प्रचंड तणावाखाली आल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याशी संपर्क करत आहेत,पण त्यांचा संपर्क होत नाही.शिवसेनेचे ( उबाठा ) नेते मिलिंद नार्वेकर हे देखील त्यांना संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहेत.तर पालघर जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख हे आ.श्रीनिवास वनगा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.या सर्व घडामोडी घडत असताना वसई व नालासोपारा विधानसभा मतदारसंघातही महाविकास आघाडी व महायुतीचे इच्छुक उमेदवाराना महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झाले आहेत.१३३ वसई विधानसभा मतदारसंघात भाजपचे मनोज पाटील हे गेल्या तीन वर्षांपासून आपल्याला उमेदवारी मिळावी,म्हणून जोरदार प्रयत्न करत होते.पण त्यांच्या ऐवजी श्रमजीवी संघटनेच्या नेत्या स्नेहा दुबे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.स्नेहा दुबे यांचे पक्षकार्यात कोणतेही योगदान नसताना,अचानक त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही बिघाडी निर्माण झाली आहे.या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या समीर वर्तक यांच्या तोंडाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाने पुसली.येथे माहितीचा अधिकार कार्यकर्ता असलेल्या आणि लोकांना माहीत नसलेल्या संदीप पांडे यांना उमेदवारी देण्यात आली.समीर वर्तक व संदीप पांडे हे दोघेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कट्टर समर्थक,पण त्यांनी आपले दान संदीप पांडे यांच्या पारड्यात टाकले.त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचे काम करतील,असे वाटत नाही.१३२ वसई विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा विजय पाटील यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे शिवसेनेचे ( उबाठा ) पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचे काम करतील,असे वाटत नाही.नवघर शिवसेनेचे प्रमुख राजाराम बाबर यांनी तर आम्ही विजय पाटील यांचे काम करणार नाही,अशा आशयाचे पत्रक प्रसिद्धीस देऊन आघाडीचा धर्म पाळण्यास साफ नकार दिला आहे.या दोन्ही मतदारसंघात आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर या दोघांनी मात्र जल्लोषात प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.काल उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी जे शक्तिप्रदर्शन घडवले,ते पाहता हे दोघेही प्रचंड मताधिक्य घेत विजयस्तंभ नक्की गाठतील,असे वाटते.

