दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
पालघर विधानसभा ; तिरंगी लढत होण्याची शक्यता,
१३० पालघर विधानसभा ( अनु.ज.) या मतदारसंघात अद्याप एकाही पक्षाने आपल्या उमेदवाराची नांवे जाहीर केलेली नाहीत.पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडी हे दोघेही प्रयत्नात आहेत.२००९ चा एकमेव अपवाद वगळता हा गड कायम तीन दशके एकसंघ सेनेच्या ताब्यात राहिला.२००९ मध्ये काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांनी सेनेच्या मनिषा निमकर यांच्यावर निसटता विजय मिळवला होता.हा एकमेव अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सेनेचा वरचष्मा राहिला.२०१४ साली सेनेतून उमेदवारी मिळवणारे कृष्णा घोडा यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांच्यावर केवळ ५१५ मतांनी विजय मिळवला होता.त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे चिरंजीव अमित घोडा यांनी सेनेच्या तिकिटावर पोटनिवडणुक लढवली व ते विजयी झाले होते.२०१९ साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या योगेश शंकर नम यांचा तब्बल ४० हजार ३०५ मतांनी पराभव केला.मात्र श्रीनिवास वनगा यांची पाच वर्षांची कारकीर्द गडद अंधाराची राहिली.त्यांच्या काळात नजरेत भरेल असे एकही विकासकाम झाले नाही.तसेच विधानसभेत ते कायम मौनी बाबा म्हणून वावरले.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते त्यांच्या गटात सामील झाले,पण ते सक्रिय होऊ शकले नाही.तरीही ते उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत,पण त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही.त्यांच्या ऐवजी शिंदे गटात नुकत्याच सामील झालेल्या मनिषा निमकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.पण पालघरचे मतदार त्यांना स्विकारतील,असे वाटत नाही.महाविकास आघाडीतुन ही जागा शिवसेनेलाच ( उबाठा ) मिळणार आहे,पण आजच्या घडीला त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हापरिषद सदस्य ऍड.काशिनाथ चौधरी यांना शिवसेनेच्या तिकिटावर उभे करण्यात येणार आहे.बविआदेखील येथे आपला उमेदवार उभा करेल,अशी शक्यता आहे.पण त्यांनी आपले पत्ते अद्याप खोलले नाहीत.येथे तिरंगी लढत होत असली तरी उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती ऍड.काशिनाथ चौधरी विजयीस्तंभाकडे घेऊन जाईल,असे वाटते.

