दीपक मोहिते,
मुंबईच्या क्षितिजावरून…
सुज्ञ मतदार,मिंध्ये सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही,
कोरोनानंतर मुंबई महानगर पालिकेचा प्रशासकीय कारभार शासनानियुक्त प्रशासकाकडे गेल्यानंतर नावाजलेल्या शहराची अक्षरशः दुर्दशा झाली.प्रशासकाच्या माध्यमातून मिंध्ये सरकारने मनमानी तसेच उधळपट्टीचा कारभार करत आपले खिसे भरले.अधिकारी व मिंध्ये सरकारच्या नेत्यांनी ” आपण दोघे भाऊ भाऊ,धुसून पुसून खाऊ,” असे धोरण राबवले.या नेत्यांची व अधिकाऱ्यांची घरे भरली,पण मुंबई शहरातील करदात्यांची मात्र पार दैना झाली.चालायला धड रस्ते नाहीत,अनधिकृत फेरीवाल्यांचे पदपथावर अतिक्रमण,वाहतूककोंडी,शहर स्वच्छतेवर हजारो कोटी रु.खर्च करूनही शहराला आलेले बकाल स्वरूप,महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये भ्रष्टाचाराला आलेला ऊत, रस्त्याच्या कामात बोकाळलेला आर्थिक गैरव्यवहार,निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना देण्यात येणारी कामे,कामे न करता देयके अदा करणे,कॅगने ताशेरे मारल्यानंतरही आर्थिक गैरव्यवहार सुरूच राहणे व त्याला सरकारचा छुपा पाठिंबा मिळणे,अशा विविध कारणांमुळे मुंबईकर नागरिक,या निवडणुकीत सरकारला चांगलाच इंगा दाखवणार आहेत.पराभवाच्या भितीने सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सतत पुढे ढकलत आहे.पण सरकारची ही कृती त्यांच्या चांगलीच अंगलट येणार आहे.या निवडणुका पुढे ढकलणे,म्हणजे ” आजचे मरण,उद्यावर,” ढकलण्यासारखे आहे.आज मुंबई शहरातील अनेक विकासकामे अर्धवट अवस्थेत आहेत,पण कंत्राटदार ठेक्याची बिले घेऊन मोकळे झाले आहेत.या बिलाची टक्केवारी कोणाच्या घशात जात आहे,हे सांगायला नको.जे शहर एकेकाळी भारताचे वैभव म्हणून ओळखले जायचे ते शहर आज या मिंध्ये सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे पार लयाला गेले आहे.अनेक उद्योगपती आपला गाशा गुंडाळून इतर राज्यात जात आहेत,पण गेंड्याची कातडी असलेले हे मिंध्ये सरकार लूटमार करण्यात गुंतले आहे.मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी राज्यासोबत महानगरपालिकेची तिजोरीही साफ केली.महानगरपालिकेच्या मुदतीच्या ठेवींना आजवर एकाही सरकारने हात लावला नव्हता,पण या मिंध्ये सरकारने तेही करून दाखवले.या मिंध्ये सरकारचे आज कशावरही नियंत्रण नाही,कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.आमच्या आया बहिणी रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतताना जीव मुठीत धरून घर गाठत असतात.सकाळी कामावर गेलेली आपली मुलगी सुरक्षितपणे घरी येतील का ? अशा विवंचनेत त्यांचे आई वडील असतात,पण या मिंध्ये सरकारला त्याच्याशी काही देणे घेणे नाही.सत्ता ही रयतेसाठी राबवायची असते,पण हे मिंध्ये सरकार सत्ता आपल्या पाच पिढ्या बसून खातील,यासाठी राबवत आहेत.पण या निवडणुकीत राज्याचा सुज्ञ मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

