दीपक मोहिते,
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात होणार तिरंगी लढत,
महाविकास आघाडीतर्फे १३२ नालासोपारा व १३३ वसई हे दोन विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार आहेत,याविषयी असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही.१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात पंकज देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.बविआचे क्षितिज ठाकूर,भाजपचे राजन नाईक व शिवसेनेचे ( उबाठा ) पंकज देशमुख यांच्यामध्ये तिरंगी लढत होईल,अशी शक्यता आहे.
भाजपचे राजन नाईक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले भाजपचे नेतृत्व आहे.गेली अनेक वर्षे त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्षपद भूषवले असून वसई तालुक्यात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.वसई-विरार शहर महानगरपालिकेवर ते नगरसेवक म्हणून निवडूनही गेले होते.२०१४ साली त्यांनी विधानसभा लढवली होती.त्या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती,मात्र या निवडणुकीत त्यांचा ४५ हजार मतांनी पराभव झाला.त्यानंतर आता २०२४ च्या
या निवडणुकीत त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी चालवली होती.काल भाजपच्या पाहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर झाले व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.गेल्या पंधरा दिवसापासून बूथप्रमुख,प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्याच्या बैठका सुरू होत्या.आता त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक कामांना वेग येणार आहे.
पंकज देशमुख हे पूर्वाश्रमीचे बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते,पण काही कारणास्तव त्यांनी वर्षभरापूर्वी आघाडीला सोडचिठ्ठी दिली व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.त्यांच्या रूपाने सेनेला एक तरुण चेहरा मिळाला.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेत आल्या आल्या त्यांना सेनेचे जिल्हाप्रमुखपद बहाल केले.अवघ्या वर्षभरात त्यांनी पक्षाची चांगली बांधणी केली,तसेच शेकडो तरुणांना पक्षात आणले.गेल्या लोकसभा निवडणुकीत सेनेच्या भारती कामडी यांना या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.या मतदारसंघात भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांना १ लाख ३६ हजार ८१८,तर बविआच्या राजेश पाटील यांना ७९ हजार ४६० व भारती कामडी याना ६६ हजार १५० मते मिळाली.भारती कामडी यांना जी मते मिळाली,त्यामध्ये पंकज देशमुख यांचा सिहांचा वाटा होता.पंकज देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी तिकीट त्यांनाच मिळणार,अशी खात्री असल्यामुळे शिवसैनिक सध्या कामाला लागले आहेत.या मतदारसंघात तीन वेळा निवडून आलेले आ.क्षितिज ठाकूर हे देखील चौथ्यांदा बाजी मारण्यासाठी सज्ज झाले आहे.तरुणांची फौज दिमतीला आहे,तसेच युवा आमदार या नात्याने त्यांनी पंधरा वर्षात जी विकासकामे त्यानी केली,त्या बळावर ते पुन्हा रिंगणात उतरले आहेत.

