दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडीमध्ये घमासान,
जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडीमध्ये सध्या घमासान सुरू झाले आहे.दोघांचे वरिष्ठ नेते सर्व काही आलबेल असल्याचा दावा करत असले तरी दोघांच्या घराच्या चिमणीतून धूर बाहेर पडू लागला आहे.महाविकास आघाडीमध्ये नाना पटोले व संजय राऊत या दोघांमध्ये दररोज कलगीतुरा रंगत आहे.नाना पटोले याना आवर घालण्यासाठी राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे या दोघांनी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांना मुंबईत पाचारण केले आहे.त्यांनी मुंबईत आल्या आल्या मातोश्रीवर जाऊन सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली व तोडगा दृष्टीक्षेपात आला.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही ” रबर तुटेपर्यंत ताणू नका,” असे स्पष्ट करत संजय राऊत याना अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले.त्यामुळे तूर्तास वादाला पूर्णविराम मिळाला आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर नाना पटोले यांच्या डोक्यात हवा शिरली व ते घटक पक्षाशी तोऱ्यात वागू लागले.दुसरीकडे संजय राऊतही वायफळ बडबड करत सुटले.गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना संजय राऊत यांनी या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवला.त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाराज झाले.त्यामुळे त्यांनी विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवले.या विशाल पाटील यांनी सेनेच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला.सांगली जिल्हा हा माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांचा परपरांगत मतदारसंघ,आणि विशाल पाटील हे त्यांचे नातू,त्यांची ही पार्श्वभूमी लक्षात न घेता संजय राऊत यांनी केलेला चावटपणा हा सेनेच्या अंगलट आला.तेंव्हापासून नाना पटोले व संजय राऊत यांचे एकमेकांशी शीतयुद्ध सुरू झाले.आता विदर्भातील रामटेक विधानसभेवरून काँग्रेस व शिवसेना या दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे.या दोघांमध्ये सुरू असलेला वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचल्यानंतर राहुल गांधी व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यातील नेत्याना संयम बाळगा,असा इशारा दिला व प्रभारी असलेले रमेश चेन्नीथाला यांना उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत पाठवले.त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन असलेले गैरसमज दूर केले,त्यामुळे दोघांमध्ये असलेला तणाव निवळला.
महाविकास आघाडीमध्ये सध्या २६० जागांवर एकमत झाले आहे.उर्वरित २८ जागांचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही घटक पक्षात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे.या सर्व घडामोडी घडत असताना शरद पवार मात्र,आपल्या वाट्याला आलेल्या ७५ जागांवर लक्ष्य केंद्रित करण्याच्या कामात गुंतले आहेत.
दुसरीकडे महायुतीमध्ये जोरदार ओढाताण सुरू झाली आहे.भाजपने १६० जागांचा हट्ट धरला आहे,तर शिंदे गट ८० ते ९० जागांवर ठाम आहे.तर अमित शहा यांनी अजित पवार यांना ” त्याग,” करण्याचा सल्ला दिला आहे.अजित पवार गटाला ४० पेक्षा कमी जागा मिळतील,अशी शक्यता आहे.त्यांच्या वाट्याला जर कमी जागा आल्या तर त्यांच्या पक्षात मोठ्याप्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

