दीपक मोहिते,
आ.हितेंद्र ठाकूर यांच्या निर्णयाकडे जिल्हावासीयांचे लक्ष,
गेल्या काही दिवसात वसई-विरार उपप्रदेशात घडलेल्या घडामोडीमुळे आ.हितेंद्र ठाकूर यांच्याविषयी सहानुभूतीच्या त्सुनामीची लाट उसळली आहे.वसईकर जनतेने त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड दबाव आणला आहे.त्यांनी ही निवडणूक लढवावी,हे सांगण्यासाठी दररोज वसई तालुक्यातील नागरिकांचे लोंढेच्या लोंढे विवा महाविद्यालयामधील त्यांच्या कार्यालयावर धडकत आहेत.आ.हितेंद्र ठाकूर,हे जनतेच्या विनंतीला मान देऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात कि वेगळी खेळी करतात,हे येणाऱ्या १५ दिवसात स्पष्ट होणार आहे.
२०१९ च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आ.हितेंद्र ठाकूर यांनी यापुढे आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.त्यांच्या त्या म्हणण्यावर ते आजही कायम आहेत.पण जिल्ह्याचे राजकारण आता वेगळ्या वळणावर आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी किंबहुना त्यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या जनतेने त्यांच्यावर निवडणूक लढवण्यासंदर्भात दबाव वाढवला आहे.मात्र त्यांनी याविषयी सध्या तरी मौन बाळगले आहे.अत्यन्त शांत व संयम बाळगत आ.हितेंद्र ठाकूर हे आलेले प्रत्येक संकट यशस्वीपणे परतवत असतात.आजवर त्यांच्यावर अनेक संकटे आली,पण विचलित न होता,त्यांनी संकटाशी यशस्वी मुकाबला केला.आज राज्याच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव आहे.प्रत्येक राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत.अनेक राजकीय पक्षाचे नेते,त्यांची मदत आपल्याला व्हावी,यासाठी देव पाण्यात टाकून बसलेले असतात.मैत्री व राजकारण ही दोन्ही विभिन्न अंगे आहेत.त्याची एकमेकांशी गल्लत होता कामा नये,मैत्रीमध्ये कधीही राजकारण होता कामा नये,असे ते आवर्जून सांगत असतात.आजवर त्यांची राजकीय वाटचाल ही अशाच वागण्यावर झाली.त्यामुळे त्यांनी कधीही कोणाशी वैर धरले नाही.निवडणूक लढवण्यासंदर्भात तोंडातून चकार शब्द काढत नसले तरी शेवटच्या क्षणी ते धक्का देतील,अशी शक्यता आहे.ते कोणता निर्णय घेतात,याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

