दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
शिवसेनेचा दसरा मेळावा ; भावी राजकारणाची दिशा ठरणार का ?
सालाबादप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा,हा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा बिकेसी मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे.या दोघांच्या दसरा मेळाव्यासोबत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे देखील आता दसरा मेळावा घेण्यासाठी सरसावले आहेत,त्यांचा मेळावा कुठे होणार आहे,याविषयी अद्याप माहिती उपलब्ध नाही.
या दसरा मेळाव्याचा इतिहास व अविभक्त सेनेची वाटचाल,याविषयी आपण माहिती घेऊया.अविभक्त शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा सेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ३० ऑक्टो.१९६६ रोजी शिवाजी पार्कवर घेतला होता.तेंव्हापासून सेनेचा दसरा मेळावा व शिवाजी पार्क,असे अतूट नाते निर्माण झाले होते.ते आजही कायम आहे.दरवर्षी होणाऱ्या या दसरा मेळाव्याला एक पक्ष,एक नेता व एक मैदान,असे समीकरण निर्माण झाले असून ते आजतागायत टिकून आहे.सेनाप्रमुख बाळासाहेबांचे या शिवाजी पार्क मैदानावर प्रचंड प्रेम होते.त्यांनी चालवलेली परंपरा पुत्र उद्धव ठाकरे यांनी पुढे चालू ठेवली आहे.२००५ साली मुंबई उच्च न्यायालयात हे मैदान शांतता क्षेत्रात येत असून,वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे या मैदानावर राजकीय पक्षांच्या जाहीर सभांना परवानगी देऊ नये,अशाप्रकारची जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.त्यानंतर न्यायालयाने ६० डेसीबलपेक्षा अधिक आवाजावर मर्यादा घालून परवानग्या देण्याचे आदेश दिले.ते आदेश पाळत दरवर्षी दसरा मेळावा पार पडतो.पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी शिवसेनेची भूमिका व भावी काळातील आपली वाटचाल स्पष्ट केली होती.पक्षाची भूमिका अधोरेखित करण्याची ही परंपरा उद्धव ठाकरे यांनी आजही कायम राखली आहे.बाळासाहेबांनी अखेरच्या दसरा मेळाव्यात ” मला,तुम्ही सर्वांनी इतके वर्ष सांभाळले,आता माझ्या उद्धव व आदित्यला सांभाळा व दैदिप्यमान महाराष्ट्र घडवा,” असे भावनिक आवाहन केले.त्यांच्या या भावनिक आवाहनाने संपूर्ण शिवाजी पार्क मैदान सद्गदित झाला होता.२०१२ मध्ये झालेल्या या दसरा मेळाव्यात त्यांनी व्हिडियो कॉन्स्फरिंगच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला होता.त्यावेळी प्रथमच अत्यंत गलितगात्र झालेले बाळासाहेब सगळ्यांच्या नजरेस पडले होते.
त्यानंतर शिवसेनेत फार मोठ्या उलथापालथी झाल्या.१९८९ पासून भाजपशी असलेली युती २०१९ साली तुटली,उद्धव ठाकरे यांनी कॉग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली.निवडणूक व सत्तेच्या राजकारणापासून कायम दूर राहिलेल्या बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे मंत्री झाले.त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात पक्षात मोठी फूट पडली व उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले.ज्या शिंदे यांना त्यांनी भरभरून दिले,त्या शिंदेनी भाजपच्या नादी लागून गद्दारी केली,अवघा महाराष्ट्र अवाक झाला.त्यांचे हे कृत्य उभ्या महाराष्ट्राच्या मनाला पटले नाही.त्याचे परिणाम नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांना भोगावे लागले.अशा परिस्थितीत शिवसेनेचे हे दोन्ही गट दसरा मेळावे घेत आहेत.बघूया या दसरा मेळाव्यात या दोघांच्या राजकारणाची दिशा कशी असेल,ते….

