दीपक मोहिते,
समजूतदारपणा,
पक्षांतर ; वावगं काही नाही,पण धोके अनेक,
पक्षांतर,ही एक निरंतर प्रक्रिया आहे,ती सतत चालूच असते.ती योग्य कि अयोग्य ? याविषयी मत मतांतरे आहेत.प्रत्येकाला सत्तेच्या राजकारणाची गरज असते,तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो.तशी इच्छा असणे,हे गैर नाही.कारण तो मानवी स्वभाव आहे.स्वार्थ आणि सत्ता हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्यातून एकही राजकारणी सुटलेला नाही.
२०१४ साली मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक राजकीय पक्षातील नेत्यांची पळापळ सुरू झाली.ते वादळ इतके भयावह होते कि प्रत्येक राजकीय नेत्याला या वावटळीत आपले अस्तित्व टिकणे कठीण आहे,असे वाटू लागले व त्यांची पळापळ सुरू झाली.समुद्रात जहाज बुडू लागलं कि सर्वप्रथम जहाजातील उंदीर पळू लागतात.कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो.पण हे जे उंदीर पळत सुटले होते,ते आता पुन्हा त्याच जहाजावर परतू लागले आहेत.कारण,ते ज्या जहाजात गेले होते,तेथे त्यांना स्वातंत्र्य व मोकळे वातावरण मिळू शकले नाही.कारण,त्या जहाजावर अगोदरच बोक्यांचा सुळसुळाट होता.आपल्याला येथे मोकळेपणाने जगता येणार नाही,हे उमगल्यानंतर ते आता माघारी परतू लागले आहेत.तसच घाऊकपणे पक्षांतर करणाऱ्यांची अवस्था या उंदरासारखीच झाली आहे.त्यामुळे पक्ष सोडणे किंवा पक्षांतर करणे,हे अत्यन्त धाडसाचे काम आहे.दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर स्वातंत्र्य व मोकळे वातावरण मिळेल,अशी अपेक्षा करणेही चुकीचे आहे.आज एकनाथ शिंदे व अजित पवार गटाने आपापले पक्ष फोडले खरे,पण आज त्यांची अवस्था ” न घरका,न घाटका,” अशी झाली आहे.कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला किती मोठा नेता आपल्या पक्षात आला,याच्याशी कसलेही देणेघेणे नसतं.” युज अँड थ्रो,” अशी त्यांची निती असते.त्यांना समोरच्या पक्षाला फक्त ” डॅमेज,” करायचं असत.त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्या प्रत्येक राजकारण्याने लक्षात घेतले पाहिजे कि आपल्यासमोरही असेच ताट येणार आहे.” कडकडून भूक लागली आहे,जेवणाचे ताट समोर आले आहे,पण ताटात पदार्थच नाही.” आज एकनाथ शिंदे व अजित पवार गटाची ” सांगता येत नाही,आणि सहनही होत नाही,” अशीच अवस्था झाली आहे.वर्षानुवर्षे एका राजकीय पक्षात वावरल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाऊन स्थिरस्थावर होणे,आजवर कोणालाच शक्य झाले नाही.कारण,येथे विचारधारेचा प्रश्न असतो.विचारधारा ही सहजासहजी बदलता येत नाही व पूर्वीचे स्वातंत्र्य विसरताही येत नाही.८० च्यावर आमदार घेऊन एकनाथ शिंदे व अजित पवार भाजप सोबत गेले,पण त्या दोघांना भाजप काडीची किंमत देत नाहीत.त्यांना सोबत घेताना भाजपने उद्धव ठाकरे व शरद पवार यांना ” डॅमेज,” करण्याचा प्रयत्न केला,पण राजकारणात मुरब्बी असलेल्या या दोघांनी तो डाव त्यांच्यावरच उलटवला.त्यामुळे पक्षांतर करणाऱ्या प्रत्येकाने यावरून बोध घ्यायला हवा.अनेक आमदार/खासदार आता परतीच्या मार्गाला लागले आहेत,पण तेही त्यांना त्रासदायक ठरणारे आहे.कारण हल्ली भूतकाळ विसरायला कोणी तयार नसतो. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याने पक्ष सोडणे किंवा पक्षांतर करणे,किती धोकादायक आहे,हे लक्षात घेतले पाहिजे.

