दीपक मोहिते,
टेक्सटाईल पार्कविरोधात पालघरवासीयांचा आक्रोश मोर्चा,
केंद्र व राज्यसरकार पालघर जिल्ह्यावर एकामागोमाग प्रकल्प लादू लागले आहे.१९७० च्या दशकात महा.औ.विकास महामंडळ,तारापूर अणू ऊर्जा केंद्र,वाढवण बंदर,मुरबे बहुद्देशीय बंदर व आता रिलायन्स टेक्स्टाईल पार्क या प्रकल्पाचा त्यामध्ये समावेश आहे.त्यामुळे पालघरवासीयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.काल अनेक गावातील भूमीपुत्रांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढला.या मोर्च्यात माहीम,केळवे,वाकसई, ठोकराळे व कमारे या गावातील भूमिपुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माहीम ग्रामपंचायतच्या सरपंच प्रीती पाटील,कमारे ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली पडवळे आणि वाकसई ग्रामपंचायतचे सरपंच माधवी हाडळ या तिघींनी आणि केळवे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप किणी हे या आंदोलनात सहभागी झाले होते.या परिसरात टेक्स्टाईल पार्क प्रकल्प उभारून परिसरात पर्यटनवाढी ऐवजी जलप्रदूषणामुळे येथील बागायती व मासेमारीवर गंडांतर येणार आहे.आज या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. पिण्यासाठी उपलब्ध असलेले पाणी पुरत नाही, अशावेळी या टेक्सटाईल पार्कला लागणारे कोट्यवधी लिटर पाणी कुठून आणणार ? असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे.या मोर्चाची सरकारने दखल घेतली नाही,तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
आजचा मोर्चा पालघर शिवछत्रपती चौकावरून बोईसरमार्गे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.याप्रसंगी सरपंच आणि अॅड.हेमप्रकाश तरडे आदींची भाषणे झाली.त्यानंतर मागण्यांचे निवेदन सरपंच,उपसरपंच यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले.

