दीपक मोहिते,
निवडणूक विश्लेषण,
काँग्रेसने ईव्हीएम मशीनचं रडगाणं आता बंद करावे,
जम्मू-काश्मीर व हरयाणा या दोन राज्याचे निकाल हाती आल्यानंतर एक महत्वाची चर्चा सुरू झाली आहे.या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर कसा होईल,यावर आता विचार मंथन सुरू झाले आहे.जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला फारशा अपेक्षा नव्हत्या,काश्मीर खोरे हा प्रदेश मुस्लिमबहुल आहे,त्यामुळे या खोऱ्यात भाजपला फटका बसणार हे स्पष्ट होतं.कारण येथे कलम ३७० उठवण्यात आल्यामुळे मुस्लिम समाजाचा भाजपवर प्रचंड राग आहे.तो राग खोऱ्यातील मतदारांनी या निवडणुकीत ईव्हीएममधूम व्यक्त केला.जम्मू खोऱ्यात हिंदूंचे प्राबल्य आहे.पंजाबी,पंडित व मुस्लिमेतर समाज येथे बहुसंख्य आहे.त्यामुळे यावेळीही येथील मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली.येथे नॅशनल कॉन्फरन्सला कधीही थारा मिळाला नाही,तसा तो या निवडणुकीतही मिळू शकला नाही.या प्रदेशात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला चमकदार कामगिरी करता आली नाही.काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्समुळे ते काही जागा जिंकू शकले पण जम्मूमध्ये त्यांची डाळ शिजू शकली नाही.या राज्यात काँग्रेसच्या राजवटीत पंडितावर झालेल्या अनन्वित अत्याचार येथील हिंदू समाज अद्याप विसरू शकलेला नाही.त्यामुळे या राज्यात हिंदू समाजात काँग्रेसविरोधात प्रचंड रोष आहे.गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला याभागात फटका बसला होता,तसा तो या निवडणुकीतही बसला.मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाचे नाणे देखील या दोन्ही खोऱ्यात चालले नाही,कारण गेल्या निवडणुकीनंतर मुफ्ती मेहबुबा यांनी भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते,त्यामुळे खोऱ्यातील मुस्लिम समाजाचा त्यांच्यावर प्रचंड राग होता,तो या निवडणुकीमध्ये व्यक्त झाला.
कृषीप्रधान राज्य म्हणून ओळख असलेल्या हरयाणा राज्यात लागलेला निकाल,हा सर्व राजकीय विश्लेषकांना बुचकळ्यात टाकणारा असा आहे.या राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दलित,जाट व गुर्जर समाजाची एकत्रित मोट बांधली व सोशल इंजिनिरिंगचा आधार घेत भाजपला खिंडीत पकडले होते.त्यामुळे भाजप काही अंशी अडचणीत आला होता.या राज्यात कृषिविषयक प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात प्रचंड रोष होता,त्यामुळे मोदी व शहा यांनी या राज्यातील प्रचाराची धुरा स्वतःकडे न ठेवता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जगतप्रसाद नड्डा यांच्या खांद्यावर सोपवली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केवळ चार जाहीर सभा झाल्या.भाजपची ही खेळी चांगलीच यशस्वी ठरली व भाजपने बाजी मारली.वास्तविक या राज्यातील शेतकरी व महिलावर्ग भाजपवर प्रचंड नाराज असताना भाजपने ” करून दाखवले,” ही फार मोठी बाब आहे.काँग्रेसने या निकालाविरोधात आता गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे,पण ते अत्यंत चुकीचे आहे,पराभव हा खिलाडूवृत्तीने स्विकारायचा असतो.पराभव झाला की ईव्हीएम मशीनमधील गडबडीमुळे झाला,हा आरोप करणे,न्यायाला धरून नाही.त्यामुळे आपण कुठे कमी पडलो,आपलं काय चुकलं ? या प्रश्नांची काँग्रेसने उत्तरे शोधायला हवीत.हरयाणा राज्यातील निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर होतील,असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे,तसं जर घडलं तर हातातोंडाशी आलेला घास महाविकास आघाडीच्या हातून निसटण्याची भिती आहे.

