दीपक मोहिते,
विक्रमगड विधानसभा ; भुसारा विरुद्ध जनाठे,सरळ लढत होण्याची शक्यता,
इच्छुक उमेदवारांच्या प्रगती पुस्तकाचे चावडी वाचन,
विक्रमगड विधानसभा,( अनु.जमाती ) भाग क्र.६,
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे,सध्या तरी कठीण आहे.पण यांना उमेदवारी का मिळावी,त्यांचे कर्तृत्व किती ? त्यांना परिसर विकासकामाबाबत किती आस्था आहे ? त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.गेल्या महिन्यात या सर्व इच्छुकांना आपण प्रश्नावली पाठवली होती,पण एकाही इच्छूकाला यातील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे आता आपण स्वतःहून त्यांच्या या कामाचा आढावा आपल्या परीने घेतला आहे.सर्वप्रथम आपण जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नावर एक नजर टाकूया….
” ६ विधानसभा निवडणुकीसाठी मतदाराच्या हक्काची सनद,”
१) जिल्हा परिषदेच्या बंद पडणाऱ्या शाळा रोखणे व विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे,या प्रश्नी जिल्हा प्रशासनाकडे किती प्रयत्न केले,
२) ग्रामीण भागातील पाड्यापाड्यावरील रस्त्याची दुरावस्था,
३) प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे,
४) आदिवासी समाजात असलेल्या कुपोषणावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे,
५) जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण वाढावे,यासाठी विशेष प्रयत्न करणे,
६) ग्रामीण भागात उद्योगधंदे,कारखानदारी वाढावी,जेणेकरून तरुणाच्या हाताला रोजगार मिळू शकेल,यासाठी प्रयत्न करणे,
७) ग्रामीण भागातील आश्रमशाळा व अंगणवाड्या यांच्या कारभारातील गैरव्यवहार रोखणे,यामध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे,
८) अन्नधान्य पुरवठा यंत्रणेतील बजबजपुरी दूर करणे व अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावीपणे अमलबजावणी करणे,
९) जिल्ह्यातील कृषी क्षेत्र दिवसेंदिवस लयाला जात आहे,वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी भितीच्या सावटाखाली जगतोय,त्याला साहाय्य करणे,( वेळेवर नुकसानभरपाई व पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देणे,शेतीसिंचनासाठी
पाण्याचे अन्य पर्याय शोधणे,त्यासाठी धडक मोहीम राबवणे,)
१०) जिल्ह्यातील रेल्वेप्रवाश्यांच्या अडचणी व समस्यांची सोडवणूक करणे,
११) ग्रामीण भागातील पाणीटंचाई व वीजपुरवठा आदी समस्या मार्गी लावणे,शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाना दिवसा वीजपुरवठा करणे,
१२) डहाणू-नाशिक महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प अधिक काळ अडगळीत पडला आहे,त्याचा सलग पाठपुरावा करणे,
१३) आदिवासी समाजाच्या जमिनीची होणारी लूट थांबवणे, आदिवासी जमिनीची खरेदी-विक्री व्यवहार तात्काळ बंद करणे,
१४) विविध प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या भूमीपुत्रांच्या जमिनीच्या मोबदल्यात होणारी फसवणूक त्वरीत थांबवणे,
१५ ) प्रस्तावित वाढवण बंदर उभारणी संदर्भात स्थानिक भूमिपुत्रांना न्याय कसा मिळेल,यादृष्टीने मदत करणे,
१६) मच्छिमार समाजाच्या अनेक समस्या गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत,त्याचा पाठपुरावा करणे,( मच्छी सुकवणे,जाळी विणणे यासाठी आरक्षित असलेल्या त्यांच्या पारंपरिक जमिनी,समुद्रकिनाऱ्याची होणारी धूप,तुटलेल्या जेट्टी व वारंवार आदळणारी नैसर्गिक संकटे,सरकारी पातळीवर प्रयत्न करणे,)
१७) संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात स्थानिक महसूल विभागाचे अधिकारी सतत चालढकल करत असतात,सतत सुरू असलेले हे गैरप्रकार रोखणे,
१८) जंगलातील वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल रोखणे,वन्यप्राण्यांचे जंगलातील अस्तित्व उध्वस्त होऊ नये,यासाठी प्रयत्न करणे,
१९) खाडीकिनारी असलेल्या तिवरांच्या झाडांची होत असलेली बेसुमार कत्तल रोखणे,
२०) जिल्ह्यात केईएम,नायर,सेंट जॉर्ज व सायन,या शासकीय इस्पितळाच्या धर्तीवर जिल्ह्यात अत्याधुनिक इस्पितळ उभारण्यासाठी प्रयत्न करणे,
२१) तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखांन्याचे व्यवस्थापन कामगार कायदे धाब्यावर बसवत कामगारांची पिळवणूक करत असतात,त्यामुळे आजवर अनेक कुटुंबे उध्वस्त झाली,हे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करणे,
असे २१ प्रश्न पाठवले होते,पण एकाही प्रश्नाला इच्छुक उमेदवाराने उत्तर दिले नाही,यामागचे कारण असे की या इच्छुकांनी आजवर जिल्ह्याच्या विकासावर आधारीत राजकारण कधीच केले नाही.आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी केवळ विरोधासाठी विरोध,असे राजकारण केले ” पण ते जिल्ह्यातील मतदारांच्या कधीही पचनी पडले नाही.गेली तीन दशके हे असंच होत आले,आजही परिस्थितीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळत नाही असो,आपण प्रत्येक इच्छुक उमेदवाराचे प्रगती पुस्तक पाहूया..सर्वप्रथम मतदारसंघनिहाय इच्छुकांची यादी पाहूया..
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांची यादी,
१ ) वसई -आ.हितेंद्र ठाकूर,विजय पाटील,समीर वर्तक,मनोज पाटील,
२ ) नालासोपारा -आ.क्षितिज ठाकूर,राजन नाईक,पंकज देशमुख,नवीन दुबे,भरत राजपूत,
३ ) पालघर-राजेंद्र गावित,आ.श्रीनिवास वनगा,भारती कामडी,प्रकाश निकम,वैदेही वाढाण,
४ ) बोईसर-आ.राजेश पाटील,विलास तरे,विश्वास वळवी,
५ ) डहाणू-आ.विनोद निकोले,राजेंद्र गावित,
६ ) विक्रमगड-आ.सुनील भुसारा,संतोष जनाठे,
मतदारसंघनिहाय इच्छुकांची कामगिरी- ( विक्रमगड विधानसभा )
१) आ.सुनिल भुसारा-राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट )
गेली पाच वर्षे,मतदारसंघाचे आमदार,मात्र प्रभावी कामगिरी नाही,तत्पूर्वी या मतदारसंघातून माजी कॅबिनेटमंत्री कै.विष्णू सवरा व माजी खा.कै. चिंतामण वनगा हे निवडून गेले होते.२०१९ साली विद्यमान खा.डॉ.हेमंत सवरा यांचा सुनिल भुसारा यांनी पराभव केला होता.सवरा,वनगा व भुसारा,या तिघांच्या काळात हा मतदारसंघ कात टाकू शकला नाही.रस्ते,गटारे,वीज,शिक्षण व आरोग्य या पायाभूत सोयी-सुविधा क्षेत्रात फारशी विकासकामे झाली नाहीत.विक्रमगड बाजारातील मुख्य रस्त्याची असलेली दुर्दशा व सतत होणारी वाहतूक कोंडी,यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहे.या मतदारसंघात लोकप्रतिनिधी उदासीन राहिल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच फावले.या मतदारसंधातील जव्हार व मोखाडा या दोन तालुक्यातील शहरी भाग वगळता ग्रामीण भागात विकासाचा पत्ता नाही.कुपोषण,चालायला धड पायवाटा नाहीत,कुपोषित बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार पुरवठा व्यवस्थेतील अनियमितता,बालमृत्यू,इ.समस्या या मतदारसंघातील जनतेच्या पाचवीला पूजल्या आहेत.आ.भुसारा यांची पक्षात नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांचा सर्वाधिक राबता नाशिक जिल्ह्यात असतो,ते मतदारसंघात एखादी दुर्घटना घडली की पीडिताच्या घरी जाऊन सांत्वन करतात,त्याचे सेल्फी काढून माध्यमांवर पोस्ट करण्यात धन्यता मानतात.त्यामुळे या निवडणुकीत भाजप त्यांना खिंडीत पकडतील,अशी शक्यता आहे.
२) संतोष जनाठे,भाजप,
हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार आहे,बोईसर विधानसभा मतदारसंघ,हा जागावाटपाच्या हाणामारीमध्ये शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे,त्यामुळे विक्रमगड मतदारसंघात संतोष जनाठे यांचे नांव चर्चेत आहे.२०१९ साली जनाठे यांनी बोईसर मतदारसंघात बंडखोरी करत बविआच्या राजेश पाटील यांच्या विजयाला हातभार लावला होता.त्यावेळी त्यांना उमेदवार म्हणून रिंगणात कोणी उतरवलं होत,हे जगजाहीर आहे.त्यावेळी जनाठे यांनी केलेला प्रभावी प्रचार आजही लोकांच्या लक्षात आहे.मी निवडून आलो तर फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री असेन,असे त्यांनी जाहीर केले होते,त्यांच्या या एका वक्तव्यामुळे त्यांच्या बंडखोरीमागे कोण होते,हे स्पष्ट झाले होते.त्यांच्या व्यतीरिक्त भाजपकडे या मतदारसंघात प्रभावी उमेदवार नसल्यामुळे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.जनाठे याना उमेदवारी मिळाल्यास ते सुनिल भुसारा यांची चांगली दमछाक करू शकतील, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
समाप्त,

