दीपक मोहिते,
” भाऊबंदकी,”
भाऊबंदकीवर अद्याप लस नाही…
गृहकलह व भाऊबंदकीच्या शापाने इतिहासकाळात अनेक साम्राज्ये बुडाली,त्याकाळी लागलेली लागण,आजही तशीच सुरू आहे.प्लेग व कोरोना अशा अस्मानी संकटावर आपण यशस्वीपणे मात करू शकलो.पण गृहकलह व भाऊबंदकी या असाध्य रोगावर आपण कोरोनासारखी लस तयार करू शकलो नाही.मराठा साम्राज्याला घरघर का लागली,पेशवाई का बुडाली ? या प्रश्नाच्या खोलात जाऊन पाहिल्यास आपल्या समोर मराठेशाहीचा काळाकुट्ट येतो.
सातशे ते आठशे वर्षात आपण अनेक स्थित्यंतरे पाहिली व परिवर्तनाच्या उसळलेल्या लाटा अनुभवल्या.
पण या असाध्य अशा रोगावर कामस्वरूपी उपाययोजना करू शकलो नाही.त्यामुळे आता भाऊबंदकीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे.पूर्वी राजघराण्यात हे पाहायला मिळत असे,अभयसिंहराजे,कल्पनाराजे,उदयनराजे व शिवेंद्रराजे या भोसले घराण्यातील संघर्ष पराकोटीला गेलेला आपण पहिला.पण आता त्याचा विस्तार होत गेला आहे.उद्योग व राजकारण,यामध्ये पावलोपावली आपण त्याचा अनुभव घेत आहोत.शिवाजी महाराजांच्या विरोधात षडयंत्र रचणारे दया अंभोरे होते,त्यांनी महाराजांच्या घराण्यातील अनेकांना विरोधात उभे केले होते.सत्तेची हाव,ही कायम विनाशाला आमंत्रण देत असते.यातून राजघराणी देखील सुटली नाही. हल्लीच्या काळात उद्योग क्षेत्रातील नावाजलेली घराणी पण त्याला अपवाद ठरू शकली नाहीत.अंबानी,टाटा,
हिरानंदानी,अदानी व गोदरेज,ही घराणी आज भाऊबंदकीमुळे दुभंगत चालली आहेत.या अशा भाऊबंदकीमुळे सातारच्या गादीला अनेक संकटांना सामोरे जावे लागले.सत्ता,स्वार्थ व समोरच्या व्यक्तीला आपल्याहून अधिक मानसन्मान मिळतो,हे पाहून भाऊबंदकीच्या रोपाला हळूहळू पालवी फुटू लागते,व कालांतराने त्या रोपाचा वटवृक्ष होतो.राजकारणात ठाकरे, पवार,मुंडे,पाटील,ही घराणी देखील अशाच भाऊबंदकीमुळे दुभंगली गेली.आपल्या देशातील अनेक उद्योगसमूह आज या अशा संकटाना तोंड देत आहेत.महाभारत व रामायण काळात काय घडलं ? ते ही आपण अनुभवलं.जोवर मानवजातीला लागलेल्या स्वार्थ व सत्तेच्या रोगावर लस निर्माण होत नाही,तोवर हे असंच निरंतर चालत राहणार आहे,त्यामुळे आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये.

