दीपक मोहिते,
” निवडणूक विशेष,”
जम्मू-काश्मीर व हरियाणा,
भाजप पराभवाच्या छायेत,
वरील दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून उद्या निकाल लागणार आहे.या दोन्ही राज्यातील मतदानानंतर जे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत,ते सारे पोल हे भाजपची चिंता वाढवणारे आहेत.या एक्झिट पोल नुसार या दोन्ही राज्यात भाजप भुईसपाट होणार आहे.जम्मू व काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ.व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आघाडीला एकूण ९० जागांपैकी ५१ ते ५८ तर भाजपला २५ ते ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काश्मीरच्या खोऱ्यात भाजपला कधीच फारशा जागा मिळत नाही.पण जम्मूच्या खोऱ्यात मात्र त्यांच्या पारड्यात अनेक जागा पडतात.या खोऱ्यात भाजपचा चांगला दबदबा आहे,मात्र या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भाजपला दणका दिल्याचे पाहायला मिळत आहेत.जम्मूच्या खोऱ्यात हिंदू समाजाचे प्राबल्य आहे,त्यामुळे भाजप येथे प्रत्येक निवडणुकीत बहुतांश जागा जिंकत आला.मात्र यावेळी काँग्रेसने त्यांचा हा गड भेदला असून सोबत असलेल्या नॅशनल कॉन्फ.ला ही त्याचा फायदा झाला आहे.जम्मूत राहणारा हिंदू समाज हा कधीही नॅशनल कॉन्फरन्स किंवा मेहबुबा मुफ्तीच्या पीडीपी पक्षाला थारा देत नव्हता,यंदा प्रथमच नॅशनल कॉन्फ.पक्षाला जम्मूच्या खोऱ्यात ७ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे.एकूण ९० जागांपैकी काश्मीर खोऱ्यात ४७ तर ४३ जागा जम्मू खोऱ्यात आहेत.३७० कलम रद्द केल्यानंतर राज्यातील अस्थिरता संपुष्टात येईल,राज्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल व गेली अनेक वर्षे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येईल,अशी अपेक्षा येथील नागरिकामध्ये व्यक्त करत होते,पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटतील,असा अंदाज आहे.
हरियाणा राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये नियोजनबद्ध आखणी केल्यामुळे भाजपचा हा गड आता जमिनदोस्त होण्याच्या तयारीत आहे.या राज्यात जाट व दलित,असा पूर्वापार संघर्ष चालत आला आहे,पण या निवडणुकीत राहुल व प्रियांका गांधी या बहिणभावानी यशस्वीपणे ” सोशल इंजिनिरिंग,” राबवले,त्यास लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.या राज्याचे एक्झिट पोल देखील भाजपच्या विरोधात गेले आहेत.जाहीर झालेल्या पोलमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५८ ते ६० जागा जिंकण्याची शक्यता आहे,तर भाजपची धाव ही १८ ते २० जागापर्यंत सीमित राहील.या राज्यातही राहुल व प्रियांका गांधी,या दोघांनी शेतकरी आंदोलन,किमान आधारभूत भाव ( एमएसपी ) व शेतकरी आंदोलन दरम्यान मोदी सरकारकडून झालेले अनन्वित अत्याचार या अशा ज्वलंत प्रश्नावर भाजपला चांगलेच घेरले.तसेच विनेश फोगाट या महिला खेळाडूला रिंगणात उतरवल्यामुळे या निवडणुकीत भाजपचे अवसान पार गळून पडले आहे.या निवडणुकीत भुपिंदर हुड्डा या जाट व दलित समाजाच्या शैलजाकुमारी यांना एकाच व्यासपीठावर आणण्यात राहुल व प्रियंका यशस्वी झाल्यामुळे या दोन्ही समाजाची ८० मते काँग्रेसच्या पारड्यात गेली आहेत.या दोन्ही राज्याचे निकाल,हे होऊ घातलेल्या महाराष्ट्र व झारखंड या राज्यातील निवडणुकांवर परिणाम करणारे ठरतील.भाजपने महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्याच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा जो प्रकार केला,तो आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

