दीपक मोहिते,
इच्छुक उमेदवारांच्या प्रगती पुस्तकाचे चावडी वाचन,
बोईसर विधानसभा,( अनु.जमाती ) भाग क्र.४,
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे,सध्या तरी कठीण आहे.पण यांना उमेदवारी का मिळावी,त्यांचे कर्तृत्व किती ? त्यांना परिसर विकासकामाबाबत किती आस्था आहे ? त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.गेल्या महिन्यात या सर्व इच्छुकांना आपण प्रश्नावली पाठवली होती,पण एकाही इच्छूकाला यातील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे आता आपण स्वतःहून त्यांच्या या कामाचा आढावा आपल्या परीने घेतला आहे.सर्वप्रथम आपण जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नावर एक नजर टाकूया….
” ६ विधानसभा निवडणुकीसाठी मतदाराच्या हक्काची सनद,”
१) जिल्हा परिषदेच्या बंद पडणाऱ्या शाळा रोखणे व विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे,या प्रश्नी जिल्हा प्रशासनाकडे किती प्रयत्न केले,
२) ग्रामीण भागातील पाड्यापाड्यावरील रस्त्याची दुरावस्था,
३) प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे,
४) आदिवासी समाजात असलेल्या कुपोषणावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे,
५) जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण वाढावे,यासाठी विशेष प्रयत्न करणे,
६) ग्रामीण भागात उद्योगधंदे,कारखानदारी वाढावी,जेणेकरून तरुणाच्या हाताला रोजगार मिळू शकेल,यासाठी प्रयत्न करणे,
७) ग्रामीण भागातील आश्रमशाळा व अंगणवाड्या यांच्या कारभारातील गैरव्यवहार रोखणे,यामध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे,
८) अन्नधान्य पुरवठा यंत्रणेतील बजबजपुरी दूर करणे व अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावीपणे अमलबजावणी करणे,
९) जिल्ह्यातील कृषी क्षेत्र दिवसेंदिवस लयाला जात आहे,वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी भितीच्या सावटाखाली जगतोय,त्याला साहाय्य करणे,( वेळेवर नुकसानभरपाई व पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देणे,शेतीसिंचनासाठी
पाण्याचे अन्य पर्याय शोधणे,त्यासाठी धडक मोहीम राबवणे,)
१०) जिल्ह्यातील रेल्वेप्रवाश्यांच्या अडचणी व समस्यांची सोडवणूक करणे,
११) ग्रामीण भागातील पाणीटंचाई व वीजपुरवठा आदी समस्या मार्गी लावणे,शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाना दिवसा वीजपुरवठा करणे,
१२) डहाणू-नाशिक महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प अधिक काळ अडगळीत पडला आहे,त्याचा सलग पाठपुरावा करणे,
१३) आदिवासी समाजाच्या जमिनीची होणारी लूट थांबवणे, आदिवासी जमिनीची खरेदी-विक्री व्यवहार तात्काळ बंद करणे,
१४) विविध प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या भूमीपुत्रांच्या जमिनीच्या मोबदल्यात होणारी फसवणूक त्वरीत थांबवणे,
१५ ) प्रस्तावित वाढवण बंदर उभारणी संदर्भात स्थानिक भूमिपुत्रांना न्याय कसा मिळेल,यादृष्टीने मदत करणे,
१६) मच्छिमार समाजाच्या अनेक समस्या गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत,त्याचा पाठपुरावा करणे,( मच्छी सुकवणे,जाळी विणणे यासाठी आरक्षित असलेल्या त्यांच्या पारंपरिक जमिनी,समुद्रकिनाऱ्याची होणारी धूप,तुटलेल्या जेट्टी व वारंवार आदळणारी नैसर्गिक संकटे,सरकारी पातळीवर प्रयत्न करणे,)
१७) संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात स्थानिक महसूल विभागाचे अधिकारी सतत चालढकल करत असतात,सतत सुरू असलेले हे गैरप्रकार रोखणे,
१८) जंगलातील वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल रोखणे,वन्यप्राण्यांचे जंगलातील अस्तित्व उध्वस्त होऊ नये,यासाठी प्रयत्न करणे,
१९) खाडीकिनारी असलेल्या तिवरांच्या झाडांची होत असलेली बेसुमार कत्तल रोखणे,
२०) जिल्ह्यात केईएम,नायर,सेंट जॉर्ज व सायन,या शासकीय इस्पितळाच्या धर्तीवर जिल्ह्यात अत्याधुनिक इस्पितळ उभारण्यासाठी प्रयत्न करणे,
२१) तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखांन्याचे व्यवस्थापन कामगार कायदे धाब्यावर बसवत कामगारांची पिळवणूक करत असतात,त्यामुळे आजवर अनेक कुटुंबे उध्वस्त झाली,हे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करणे,
असे २१ प्रश्न पाठवले होते,पण एकाही प्रश्नाला इच्छुक उमेदवाराने उत्तर दिले नाही,यामागचे कारण असे की या इच्छुकांनी आजवर जिल्ह्याच्या विकासावर आधारीत राजकारण कधीच केले नाही.आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी केवळ विरोधासाठी विरोध,असे राजकारण केले ” पण ते जिल्ह्यातील मतदारांच्या कधीही पचनी पडले नाही.गेली तीन दशके हे असंच होत आले,आजही परिस्थितीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळत नाही असो,आपण प्रत्येक इच्छुक उमेदवाराचे प्रगती पुस्तक पाहूया..सर्वप्रथम मतदारसंघनिहाय इच्छुकांची यादी पाहूया..
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांची यादी,
१ ) वसई -आ.हितेंद्र ठाकूर,विजय पाटील,समीर वर्तक,मनोज पाटील,
२ ) नालासोपारा -आ.क्षितिज ठाकूर,राजन नाईक,पंकज देशमुख,नवीन दुबे,भरत राजपूत,
३ ) पालघर-राजेंद्र गावित,आ.श्रीनिवास वनगा,भारती कामडी,प्रकाश निकम,वैदेही वाढाण,
४ ) बोईसर-आ.राजेश पाटील,विलास तरे,विश्वास वळवी,
५ ) डहाणू-आ.विनोद निकोले,राजेंद्र गावित,
६ ) विक्रमगड-आ.सुनील भुसारा,संतोष जनाठे,
मतदारसंघनिहाय इच्छुकांची कामगिरी- ( बोईसर विधानसभा )
१) राजेश पाटील – बविआ,
गेल्या विधानसभा निवडणुकीत मतविभागणीचा फायदा होऊन राजेश पाटील,हे अल्पमतांनी निवडून आले.२००९ साली मतदारसंघाच्या फेररचनेत या मतदारसंघाची निर्मिती झाली.त्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकीत येथून बविआचा उमेदवार विजयी झाला.दोन वेळा विलास तरे व गेल्या निवडणुकीत राजेश पाटील,या तिन्ही निवडणुकीत बविआला मिळालेल्या विजयाला मतविभागणीचा हातभार लागला.बविआला या मतदारसंघाच्या पश्चिम पट्ट्यात जनाधार नाही,या पट्ट्यात त्यांची प्रत्येक निवडणुकीत पीछेहाट झाली.मात्र त्यांना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भागात तसेच वसई,विरार,नालासोपारा व नायगाव,या चार शहराच्या पूर्व भागातील गावातील मतदार प्रत्येक निवडणुकीत डोक्यावर घेतात,त्यामुळे त्यांना प्रत्येकवेळी विजयी स्तंभ गाठता आला.वास्तविक ही परिस्थिती लक्षात घेऊन आ.पाटील यांनी गेल्या पाच वर्षात बोईसरच्या पश्चिम पट्ट्यात पक्षबांधणीकडे लक्ष देण्याची गरज होती,पण या महत्वाच्या विषयासंदर्भात त्यांनी फारसे लक्ष दिले नाही.सध्याच्या राजकारणात अर्थकारणाला प्रचंड महत्व आले आहे,गेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा अनुभव त्यांनी घेतला आहे.त्यामुळे त्यांनी आपला फोकस बोईसरच्या पश्चिम पट्ट्यावर ठेवायला हवा होता.महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे,पालघरची जागा जर शिंदे गटाला दिली गेली तर ही जागा भाजप लढवेल,आणि भाजप जर मैदानात उतरली तर मात्र पाटील यांना विजयासाठी प्रखर झुंज द्यावी लागणार,हे मात्र निश्चित,
२) विलास तरे-भाजप,
बविआच्या तिकिटावर दोन वेळा या मतदारसंघातून निवडून गेलेल्या विलास तरे यांचे पक्षातील एका वरिष्ठ नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे गेल्या निवडणुकीत पक्षाशी फारकत घेत,त्यांनी शिवसेनेची वाट धरली व ते तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले,बविआला जसा बोईसरच्या पश्चिम पट्ट्यात फटका बसतो,तसा विलास तरे याना वसई तालुक्यातील अनेक गावांत बसला.तसेच त्यावेळी भाजपने आपल्या एका पदाधिकाऱ्याला येथे बंडखोरी करायला लावली होती.या बंडखोर उमेदवाराने २५ हजारहुन अधिक मते मिळवली व विलास तरे भुईसपाट झाले.या निवडणुकीत राजेश पाटील अगदी अल्पमतांनी निवडून आले.पण या निवडणुकीत विलास तरे व त्यांचा भाजप गाफील राहणार नाहीत.गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांनी प्रचंड मताधिक्य घेत लक्षणीय कामगिरी केली.त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आपले सर्वस्व पणाला लावतील,अशी शक्यता आहे.
३) डॉ.विश्वास वळवी, शिवसेना ( उबाठा )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेल्या डॉ.विश्वास वळवी यांनी आपल्याला शिंदे गटातून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे पाहून काही महिन्यांपूर्वी आपल्या मनगटावर शिवबंधन बांधले.त्याना ठाकरे गटातून हमखास उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.मूळचे ठाण्याचे असल्यामुळे बोईसरवासीय त्यांना थारा देतील,असे वाटत नाही.आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे त्यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून या भागात अनेक उपक्रम राबवले,लाखो रु.खर्च केले,पण ते फळाला लागतील,असे वाटत नाही.त्यामुळे या मतदारसंघात बविआ-भाजप अशी सरळ लढत होईल,असा अंदाज आहे.
क्रमशः-उद्या डहाणू विधानसभा मतदारसंघ,

