दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अरे कुठे नेवून ठेवला आमचा महाराष्ट्र ?
विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे राज्यातील जनतेला काय काय पाहावे लागणार आहे,देवजाणे ? कोण मंत्रालयाच्या सज्यातून उड्या मारतो,कोण गुलाबी जाकीट घालून फिरतोय,तर कोण दर दोन ते दिवसाने मोदी व शहा यांच्या विमानाची वाट बघत विमानतळावर ताटकळत उभे राहत आहेत.अरे काय चाललंय आमच्या मराठी मुलखात,कुठे नेवून ठेवला आहे,आमचा महाराष्ट्र ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हा-आम्हाला कधीही मिळणार नाही.भले मग आमचा महाराष्ट्र कायदा – सुव्यवस्थेविषयी रसातळाला गेला तरी बेहत्तर…
आज या राजकारण्यांनी केलेली आपल्या महाराष्ट्राची अवस्था पाहून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपले देह ठेवले ते हुतात्मा नक्कीच ढसाढसा रडत असतील.पण ही रडायची वेळ नाही,ज्या रयतेने महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रयत्न केले,त्यांना **** पाय लावून पळायला लावले,त्यांना महाराष्ट्राचे मतदार नुसते पळवणार नाहीत,तर त्यांचे कपडे देखील काढून घेणार आहेत.आज या सरकारच्या काळात महिला व अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत.दिवसागणिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत,या राज्यात आज कोणीच सुरक्षित नाहीत.अशावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे एखादी अप्रिय घटना घडली की माध्यमांसमोर येऊन चौकशीचे आदेश दिले आहेत,एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही,पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे,अशी पोपटपंची करताना पाहायला मिळतात.त्यांची पोपटपंची संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्क्रिप्ट घेऊन माध्यमांसमोर हजर होतात.या सर्व घडामोडीतून माध्यमांचे उखळ पांढरे होत असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधीही या लोकांच्या शासकीय निवासाच्या गेटवर बुम व कॅमेरे घेऊन ताटकळत उभे असतात.राज्य आर्थिक खाईत गेले असताना आपले राज्यकर्ते मात्र उधळपट्टीच्या खेळात रमले आहेत,त्यामुळे या लोकांनी मतदारांवर कितीही पैश्याची उधळपट्टी केली तरी ते यांना थारा देतील,असे वाटत नाही.

