इच्छुक उमेदवारांच्या प्रगती पुस्तकाचे चावडी वाचन,
नालासोपारा विधानसभा,भाग क्र.२,
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे,सध्या तरी कठीण आहे.पण यांना उमेदवारी का मिळावी,त्यांचे कर्तृत्व किती ? त्यांना परिसर विकासकामाबाबत किती आस्था आहे ? त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.गेल्या महिन्यात या सर्व इच्छुकांना आपण प्रश्नावली पाठवली होती,पण एकाही इच्छूकाला यातील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे आता आपण स्वतःहून त्यांच्या या कामाचा आढावा आपल्या परीने घेतला आहे.सर्वप्रथम आपण जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नावर एक नजर टाकूया….
” ६ विधानसभा निवडणुकीसाठी मतदाराच्या हक्काची सनद,”
१) जिल्हा परिषदेच्या बंद पडणाऱ्या शाळा रोखणे व विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे,या प्रश्नी जिल्हा प्रशासनाकडे किती प्रयत्न केले,
२) ग्रामीण भागातील पाड्यापाड्यावरील रस्त्याची दुरावस्था,
३) प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे,
४) आदिवासी समाजात असलेल्या कुपोषणावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे,
५) जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण वाढावे,यासाठी विशेष प्रयत्न करणे,
६) ग्रामीण भागात उद्योगधंदे,कारखानदारी वाढावी,जेणेकरून तरुणाच्या हाताला रोजगार मिळू शकेल,यासाठी प्रयत्न करणे,
७) ग्रामीण भागातील आश्रमशाळा व अंगणवाड्या यांच्या कारभारातील गैरव्यवहार रोखणे,यामध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे,
८) अन्नधान्य पुरवठा यंत्रणेतील बजबजपुरी दूर करणे व अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावीपणे अमलबजावणी करणे,
९) जिल्ह्यातील कृषी क्षेत्र दिवसेंदिवस लयाला जात आहे,वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी भितीच्या सावटाखाली जगतोय,त्याला साहाय्य करणे,( वेळेवर नुकसानभरपाई व पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देणे,शेतीसिंचनासाठी
पाण्याचे अन्य पर्याय शोधणे,त्यासाठी धडक मोहीम राबवणे,)
१०) जिल्ह्यातील रेल्वेप्रवाश्यांच्या अडचणी व समस्यांची सोडवणूक करणे,
११) ग्रामीण भागातील पाणीटंचाई व वीजपुरवठा आदी समस्या मार्गी लावणे,शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाना दिवसा वीजपुरवठा करणे,
१२) डहाणू-नाशिक महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प अधिक काळ अडगळीत पडला आहे,त्याचा सलग पाठपुरावा करणे,
१३) आदिवासी समाजाच्या जमिनीची होणारी लूट थांबवणे, आदिवासी जमिनीची खरेदी-विक्री व्यवहार तात्काळ बंद करणे,
१४) विविध प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या भूमीपुत्रांच्या जमिनीच्या मोबदल्यात होणारी फसवणूक त्वरीत थांबवणे,
१५ ) प्रस्तावित वाढवण बंदर उभारणी संदर्भात स्थानिक भूमिपुत्रांना न्याय कसा मिळेल,यादृष्टीने मदत करणे,
१६) मच्छिमार समाजाच्या अनेक समस्या गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत,त्याचा पाठपुरावा करणे,( मच्छी सुकवणे,जाळी विणणे यासाठी आरक्षित असलेल्या त्यांच्या पारंपरिक जमिनी,समुद्रकिनाऱ्याची होणारी धूप,तुटलेल्या जेट्टी व वारंवार आदळणारी नैसर्गिक संकटे,सरकारी पातळीवर प्रयत्न करणे,)
१७) संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात स्थानिक महसूल विभागाचे अधिकारी सतत चालढकल करत असतात,सतत सुरू असलेले हे गैरप्रकार रोखणे,
१८) जंगलातील वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल रोखणे,वन्यप्राण्यांचे जंगलातील अस्तित्व उध्वस्त होऊ नये,यासाठी प्रयत्न करणे,
१९) खाडीकिनारी असलेल्या तिवरांच्या झाडांची होत असलेली बेसुमार कत्तल रोखणे,
२०) जिल्ह्यात केईएम,नायर,सेंट जॉर्ज व सायन,या शासकीय इस्पितळाच्या धर्तीवर जिल्ह्यात अत्याधुनिक इस्पितळ उभारण्यासाठी प्रयत्न करणे,
२१) तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखांन्याचे व्यवस्थापन कामगार कायदे धाब्यावर बसवत कामगारांची पिळवणूक करत असतात,त्यामुळे आजवर अनेक कुटुंबे उध्वस्त झाली,हे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करणे,
असे २१ प्रश्न पाठवले होते,पण एकाही प्रश्नाला इच्छुक उमेदवाराने उत्तर दिले नाही,यामागचे कारण असे की या इच्छुकांनी आजवर जिल्ह्याच्या विकासावर आधारीत राजकारण कधीच केले लनाही.आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी केवळ विरोधासाठी विरोध,असे राजकारण केले ” पण ते जिल्ह्यातील मतदारांच्या कधीही पचनी पडले नाही.गेली तीन दशके हे असंच होत आले,आजही परिस्थितीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळत नाही असो,आपण प्रत्येक इच्छुक उमेदवाराचे प्रगती पुस्तक पाहूया..सर्वप्रथम मतदारसंघनिहाय इच्छुकांची यादी पाहूया..
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांची यादी,
१ ) वसई -आ.हितेंद्र ठाकूर,विजय पाटील,समीर वर्तक,मनोज पाटील,
२ ) नालासोपारा -आ.क्षितिज ठाकूर,राजन नाईक,पंकज देशमुख,नवीन दुबे,भरत राजपूत,
३ ) पालघर-राजेंद्र गावित,आ.श्रीनिवास वनगा,भारती कामडी,
४ ) बोईसर-आ.राजेश पाटील,विलास तरे,विश्वास वळवी,
५ ) डहाणू-आ.विनोद निकोले,राजेंद्र गावित,
६ ) विक्रमगड-आ.सुनील भुसारा,संतोष जनाठे,
मतदारसंघनिहाय इच्छुकांची कामगिरी- ( नालासोपारा विधानसभा )
१) राजन नाईक-भाजप,
भाजपकडून इच्छुक असले तरी अंतर्गत गटबाजीमुळे उमेदवारी मिळणे कठीण,मतदारसंघाच्या विकासकामासंदर्भात प्रचंड उदासीन,ठराविक तेही मोजके पदाधिकारी याव्यतिरिक्त मनुष्यबळाचा अभाव,तसेच मतदारसंघातील भाषिक संरचना लक्षात घेता उमेदवारी मिळणे अशक्य..
२) पंकज देशमुख -शिवसेना,( उबाठा )
बविआचा पुर्वाश्रमीचा युवा चेहरा,काही कारणास्तव दोन वर्षांपूर्वी बविआला जय हिंद,जय महाराष्ट्र,शिवसेनेत दाखल, सध्या उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ओळख,लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली व ती त्यांनी यशस्वीपणे पेलली.तसेच दोन वर्षात पक्ष वाढवण्यातही मोलाची कामगिरी बजावली,त्यामुळे उमेदवारी हमखास त्यांच्या गळ्यात पडणार.मतदारसंघाच्या प्रश्नासंदर्भात दांडगा अभ्यास,जनमानसात चांगली प्रतिमा,
३) नवीन दुबे-शिवसेना ( शिंदे गट )
ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्यामुळे उमेदवारीचा प्रश्न उपस्थित होत नाही.पण जागा वाटपाच्या प्रक्रियेत तडजोड झाली आणि शिंदे गटाला दिली गेली तर,त्यांच्यावर या मतदारसंघात नामुष्कीची पाळी येऊ शकते.अनेक पक्षाची वारी करून आलेल्या दुबे याना येथील मतदार थारा देणार नाहीत.मतदारसंघाच्या विकासकामांवर आजवर एकही आंदोलन नाही,किंवा समस्यांचा अभ्यास नसल्यामुळे त्यांची ओळख ही ” कॉर्पोरेट राजकीय नेता,” अशीच आहे.त्यामुळे शिंदे गट सहसा या मतदारसंघाचा आग्रह धरणार नाही,असे वाटते.
४) भरत राजपूत,भाजप,
हे मूळचे डहाणूकर,पण वसई व नालासोपारा विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य चारही मतदारसंघ हे अनु.जमातीसाठी आरक्षित असल्यामुळे त्यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.त्यासाठी माजी केंद्रीय नेत्याने जोरदार फिल्डिंग लावली आहे.आपल्याला नक्की उमेदवारी मिळणार याची खात्री पटल्यानंतर राजपूत यांनी मतदारसंघात बॅनर्स व होर्डिंग लावण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे.पण त्यांना नालासोपारावासीयांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता फार कमी आहे.येथे बाहेरच्या उमेदवाराची संभावना ” उपरे,” अशी केली जाते.त्यामुळे त्यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.तसेच त्यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपचे नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचे काम करतील,असे वाटत नाही.या मतदारसंघात उत्तर भारतीय,गुजराती व इतर भाषिक मतदारांची लोकसंख्या पाहून भाजप त्यांना रिंगणात उतरवण्याच्या प्रयत्नात आहेत,पण तो यशस्वी होणार नाही,हेही तितकेच खरे आहे.
क्रमशः-उद्या पालघर विधानसभा मतदारसंघ,

