दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
लाडकी बहीण,गोमाता,गरबा कार्यक्रमात इतर धर्मियांना बंदी व आता व्होट जिहाद,या सरकारला झालंय तरी काय ?
महायुतीच्या सरकारला आपण आगामी विधानसभा निवडणुका जिंकू शकणार नाही,हे जाणवू लागल्यामुळे सध्या ते नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत.” व्होट जिहाद,” हा त्याचाच एक भाग आहे.यापूर्वी लाडकी बहीण,नंतर गोमाता व आता हा नवीन फंडा त्यांनी बाजारात आणला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पराभव हा ” व्होट जिहाद,” मुळे झाला,असा साक्षात्कार तब्बल चार महिन्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाला व ते आता बेंबीच्या देठातून कोकलत सर्वत्र फिरू लागले आहेत.त्यांना आता गोमाता,गरबा समारंभात इतर धर्मियांना मज्जाव करणे,सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे आधारकार्ड तपासणे,असे विविध उपदव्याप सुचू लागले आहेत.
गेल्या दीड महिन्यापासून सरकारने लाडक्या बहिणीच्या पदरा आडून तुमच्या-आमच्या पैश्याची वारेमाप उधळपट्टी केल्यानंतर त्यांचे लक्ष आता गोमातेकडे वळू लागले आहे.या सरकारने राज्यात गोहत्याबंदी कायदा लागू केल्यानंतरही गायीची होणारी तस्करी अद्याप थांबू शकलेली नाही.तरीही आपल्या सरकारला आपल्या गोमातेची प्रचंड काळजी वाटू लागली आहे.काल गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना ” व्होट जिहाद,” चा कानमंत्र दिला असावा,त्यामुळे फडणवीस हे आता ” व्होट जिहाद,व्होट जिहाद,” असे कोकलत फिरू लागले आहेत.गाईला गोमाता मानणारे व गंगाआरतीला महत्व देणारे यांचे केंद्र सरकार गंगाकिनारी असलेल्या कत्तलखान्यात दररोज किती गोमातांची कत्तल होते,त्याचा किती टन कचरा गंगा नदीत टाकण्यात येतो,हे लोकांसमोर आले पाहिजे.हे सर्व कत्तलखाने मुस्लिमांचे नाही तर हिंदूधर्मियांचे आहेत.हे कत्तलखाने बंद करण्याचे धाडस मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात दाखवले नाही,उलट या सरकारने बीफ निर्यातीवरील शुल्क कमी करून या व्यवसायाला उभारी देण्याचे काम केले आहे.हे सरकार कांदे निर्यातीवर भरमसाठ शुल्क वाढवते,शेजारी असलेल्या बांगलादेशच्या सरकारने तर कांदे व संत्र्याच्या आयातीवर १८ ऐवजी ८८ रु.आयात शुल्क लावले,पण आपले सरकारने मूग गिळून तमाशाई बनण्यात धन्यता मानली.ज्या सरकारला गोहत्याबंदी बाबत आस्था आहे,त्या सरकारने बीफ निर्यातीवर बंदी घातली पाहिजे,पण आपले सरकार हे दुटप्पी आहे.गोहत्याबंदीचा कायदा हा तुम्हा-आम्हा सर्वसामान्य माणसाला लागू आहे,तो धनदांडग्यांना नाही.पराभवाच्या भितीने लाडक्या बहिणीच्या पदरा आडून आमच्या गोमातेकडे पाहणे,या नतद्रष्ट मंडळीने आता सोडून द्यावे,अन्यथा राज्याची जनता या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात नक्कीच ” राजकीय जिहाद,” पुकारेल,

