दीपक मोहिते,
भितीचे सावट,
मोदी व शहा यांचे राज्याचे दौरे ; पराभवाच्या भितीतुन,
महाविकास आघाडीला राज्यात मिळणारा प्रतिसाद व शरद पवार यांची रणनिती,लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.या महिन्यात गृहमंत्री तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.आज मुंबईत दाखल झाल्यानंतर शहा हे आमदार,पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत.भाजप व अजित पवार गटातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे या दोन्ही घटक पक्षात चिंतेचे वातावरण पसरले आहे.अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व एकेकाळी शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले दिलीप वळसे पाटीलही आता शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जुनेजाणते नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूर येथे सत्कार घडवून आणला होता.हा सत्कार त्यांनी माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मदतीने आयोजित केला होता.यावेळी व्यासपीठावर विविध पक्षाचे खासदार,आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.या सत्कार सोहळ्याला लोटलेली अलोट गर्दी पाहून महायुतीला घाम फुटला असावा,इतकी प्रचंड गर्दी या सोहळ्याला झाली होती.सत्कार सुशीलकुमार शिंदे यांचा होता,पण संपूर्ण कार्यक्रमात शरद पवार यांचाच बोलबाला होता.सत्कारमूर्ती सुशीलकुमार शिंदे यांनीही स्वतःविषयी फारसं न बोलता ते फक्त आणि फक्त शरद पवार यांच्याविषयीच बोलले.शरद पवार यांनी मला राजकारणात कसं आणले व राजकारणाचे बाळकडू कसे पाजले,याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आपल्या भाषणात चांगलीच रंगत आणली.कोर्टातील एक शिपाई म्हणून काम करणारी व्यक्ती थेट केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री होतो,ही किमया केवळ शरद पवारच करू शकतात,असे सांगताच सर्वत्र एकच जल्लोष झाला.ज्यांच्याकडे या सत्कार सोहळ्याचे पालकत्व होते ते सोलापूरचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या सहा वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते,त्यांना पुन्हा राजकारणात आणण्यासाठी शरद पवार यांनी पद्धतशीरपणे प्रयत्न केले व त्यांना पुन्हा आपल्याकडे वळवले.त्यांचे राजकारणात सक्रिय होणे,ही विरोधकांसाठी धोक्याची घंटा आहे.सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनी वडिलांची कमान व्यवस्थितपणे सांभाळली आहे.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची डाळ शिजणे कठीण आहे.गेल्या तीन महिन्यात पवारांनी भाजपमध्ये गेलेल्या अनेक आमदारांना पुन्हा माघारी बोलावण्याची जी मोहीम सुरू केली आहे,त्यास उदंड प्रतिसाद मिळत आहे.त्यांच्या या मोहिमेला भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळत असल्यामुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोघांची झोप पार उडाली आहे.आपल्या राज्याचे नेतृत्व कुचकामी ठरत असल्याची जाणीव झाल्यामुळे मोदी व शहा यांचे राज्यात आता वारंवार दौरे सुरू झाले आहेत.जम्मू-काश्मीर व हरियाणा,या दोन्ही राज्यात आपला पराभव होणार हे त्या राज्यातील परिस्थिती पाहून भांबावून गेलेले ही जोडी पार हबकून गेली आहे.या राज्यातील निकालाचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील व महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य आपल्या हातून निसटले,तर आपल्या आर्थिक नाड्याच आखडतील,अशा भितीने सध्या या दोघांना घेरले आहे.

