दीपक मोहिते,
किल्लारी भूकंप ; भूकंपग्रस्त आजही हलाखीचे जीवन जगत आहेत,
३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात पहाटे ३.५६ मिनिटाने ६.०४ रीष्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.क्षणार्धात ७ हजार ९२८ माणसे मृत्युमुखी पडली.तर १६ हजारहून अधिक लोक जखमी झाले,सुमारे १५ हजार ८५४ जनावरे आपल्या प्राणाला मुकली.५२ गावातील सुमारे सव्वा दोन लाख घरांना तडे गेले.सर्वात जास्त फटका उमरगा व औसा या दोन तालुक्यांना बसला.या घटनेला काल ३१ वर्षे पूर्ण झाली,पण या गावातील लोक अद्याप या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत.
या प्रलयंकारी भूकंपाला आज ३१ वर्षे पूर्ण झाली. मृत्यूच्या वेदना कवटाळून नव्या पिढीने पुन्हा जगण्याच्या लढाईला नव्याने सुरुवात केली होती.पण त्यांना सरकारची साथ मिळाली नाही.या प्रलयंकारी संकटात ज्यांची घरे उध्वस्त झाली,त्यांच्यासाठी राज्य शासनाने घरे उभारली.पण भूकंपग्रस्तांची संख्या लक्षात घेता अपुरी होती.त्यामुळे त्यांची जगण्याची धडपड आजही सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीत ३१ सप्टें.१९९३ रोजी प्रलयंकारी भूकंप झाला होता.सरकारी आकड्यांनुसार या आपत्तीमध्ये ७ हजार ९२८ जणांचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्षात अनेकांचे मृतदेह देखील त्यांच्या नातेवाईकांना मिळाले नाहीत.या दुर्घटनेत ३० हजाराहुन अधिक लोक बेघर झाले व १५ हजार ८५४ लोकांचा मृत्यू झाला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण ५२ खेड्यातील २ लाख ११ हजार घरांना तडे गेले.आज त्या घटनेला आता ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत.भूकंपाच्या वेळी बालवयात असलेली पिढी,आता तारुण्यात आहे.त्या तरुणांनी आपल्या जगण्याची लढाई नव्याने सुरू केली आहे.भूकंपात नातेवाईक गमवावे लागणे, हे अत्यंत क्लेशकारक होते. ३१ वर्षे हा तसा मोठा कालखंड,पण या कालखंडात औसा तालुक्यातील किल्लारी व परिसरातील खेड्यात आजही समस्या ” जैसे थे,” स्थितीतच आहेत.ओसाड माळरानावरची गावे,अन् भकास जीवन,हे येथील पिडीत लोकांच्या कष्टप्रद जीवनाचे दर्शन घडवत आहे.
भूकंपग्रस्त भागात आजही लोक मूलभूत सुविधापासून वंचित आहेत.या पीडितांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.वास्तविक सरकारने त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे होते.आजही अनेक गावांत पक्के रस्ते,गटारे,वीज व पाणी,या मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतो.भूकंपाच्या ३१ वर्षांनंतरही अनेक गावातील लोकांना घरेच मिळालेली नाहीत.अनेक लोक गावाचे वतनदार असूनही सध्या बेघर आहेत.तळणी, किल्लारी,मंगरूळ,नांदुर्गा, कारला,लामजना व परिसरातील अनेक गावात अद्यापही घराचे कबाले मिळालेली नसल्याने अनेक सरकारी योजनांचा लाभ लोकांना मिळू शकत नाही. तसेच अद्याप कारला,कुमठा व मातोळा या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.
भूकंपानंतर तयार होणाऱ्या वाढीव वस्त्यांचा प्रश्न बिकट आहे.येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबाना अद्याप ना जागेची मालकी मिळालेली नाही,ना चांगले रस्ते मिळाले आहेत. सदर कुटुंबाना शासनाच्या एकाही योजनांचा लाभ मिळणे शक्य होत नाही.पूर्वी मिळालेल्या घरात आता कुटूंब समावत नाहीत.त्यासाठी मिळालेल्या घराशेजारी पत्र्याचे शेड अनेकांना राहावे लागत आहे.भूकंपग्रस्त प्रमाणपत्र काढतानाही अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.नोकरीमधील भूकंपग्रस्तांच्या आरक्षणावरही मध्यंतरी गंडांतर आले होते.पण भुकंपग्रस्त कृती समितीने सरकारशी संघर्ष करत यश मिळवले.
३० सप्टेंबर दरवर्षी भूकंपात मरण पावलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते व काळा दिवस पाळला जातो. बंदुकीच्या गोळ्या झाडून सलामी दिली जाते.पण प्रश्न अनुउत्तरीत राहतो तो भूकंपग्रस्त भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणार कधी ? या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे शासन दरबारी व तत्कालीन लोकप्रतिनिधींनी कधीही प्रयत्न केले नाहीत.त्यामुळे भूकंपग्रस्त लोक आजही हलाखीचे जीवन जगत आहेत.

