दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
काँग्रेसच्या नेत्यानी शरद पवार यांच्याकडून शिकायला हवे,
एकीकडे महायुती व महाविकास आघाडीच्या शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये जागावाटप व मुख्यमंत्रीपदावरून दावे-प्रतिदाव्याला उत आला असताना शरद पवार मात्र हूं का चू करताना बघायला मिळत नाहीत.सर्वप्रथम लढाई जिंकणे आवश्यक आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे ते या वादात पडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या ते भाजप व अजित पवार गटाच्या नाराज आमदार व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याच्या कामात गुंतले आहेत.शत्रूचा गड सर करायचा असेल तर त्याचा पाया पोखरला पाहिजे,अशी रणनिती त्यांनी आखली आहे.त्यांच्या या रणनितीला चांगले यश मिळत आहे.अनेक आमदार व पदाधिकारी आता एकामागोमाग त्यांच्या पक्षात दाखल होऊ लागले आहेत,तर अनेक जण पक्ष प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत.उद्धव ठाकरे यांचे काही नेते व उपनेते देखील याच कामात गुंतलेले पाहायला मिळतात.पण काँग्रेसचे नेते मात्र उठसुठ आम्ही इतक्या जागा लढवणार,मुख्यमंत्रीपद आम्हालाच मिळाले पाहिजे,अशी बाष्कळ बडबड करण्यात धन्यता मानत आहेत.लोकसभा निवडणुकीत त्याना सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विमान सध्या हवेत गेले आहे.भाजपच्या कारभारामुळे वैतागलेल्या राज्याच्या जनतेने गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती,त्याचा फायदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पण झाला.त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कर्तृत्व शून्य होते.त्यांच्या पक्षाला जे काही मतदान झाले ते राहुल गांधी यांच्याकडे पाहून झाले.पण हे पटोले महाशय निकालानंतर बेडकासारखे तट्ट फुगले व सतत डरांव डरांव करत सर्वत्र फिरू लागले.प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाला हे यश मिळाल्यामुळे हे यश आपल्यामुळेच मिळाले,असा त्यांनी गोड गैरसमज करून घेतला आहे व ते सध्या वायफळ बडबड करत सुटले आहेत.उद्धव ठाकरे व शरद पवार हे दोघेही आपल्या ताकदीवर राज्यात सर्वत्र जाहीर सभा घेत आहेत,पण नाना पटोले हे आपल्या ताकदीवर अशा जाहीर सभा घेऊ शकत नाहीत.कारण त्यांच्या पक्षाकडे तरुणांचा फौजफाटा उपलब्ध नाही.पक्षबांधणीकडे या महाशयाने कधीही लक्ष दिले नाही.त्यामुळे ते स्वबळावर काँग्रेसची जाहीर सभा घेत नाहीत.महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीर सभेत मात्र ते पहिल्या रांगेत बसलेले पाहायला मिळतात.प्रदेश काँग्रेसला आजवर असेच प्रदेशाध्यक्ष लाभल्यामुळे पक्षाला गेल्या दहा वर्षात संजीवनी मिळू शकली नाही.

