दीपक मोहिते,
धोक्याची घंटा,
युवासेनेचा विजय ; महायुतीसाठी धोक्याची घंटा,
बहुचर्चित मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे निकाल काल लागले.या निवडणुकीत शिवसेना प्रणित ( उबाठा ) युवासेनेने भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पार धुव्वा उडवला.या निवडणुकीत आपला पराभव होईल,अशा भितीमुळे महायुती सरकारने ही निवडणूक दोनदा पुढे ढकलली होती.पण प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मुंबई विद्यापीठाला ही निवडणूक अत्यंत घाईघाईने घ्यावी लागली.या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे चांगलेच कान उपटले आहेत.एकूण १० पैकी ९ जागा जिंकून सिनेटवर आपले निर्विवाद वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका या कोरोनानंतर सुमारे अडीच वर्षे रखडल्या होत्या.त्या २२ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते.पण अखेरच्या क्षणी मुंबई विद्यापीठाने सरकारच्या दबावाला बळी पडून या निवडणुकीला स्थगिती दिली होती. तरुणवर्गात त्याचे तीव्र पडसाद उमटले व शिंदे सरकारवर कडाडून टीका झाली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही शिंदे सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले.त्यांच्या कोकण प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई यांनी या निवडणुका स्थगित करणे,हा प्रकार लोकशाहीचा बळी आहे तसेच हा निर्णय पदवीधर तरुणांचा अपमान करणारा आहे,अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.अशाप्रकारे सरकारला घरचा आहेर मिळाल्यानंतर विद्यापीठाने न्यायालयात लवकरच निवडणुका घेण्यात येतील, असे प्रतिज्ञापत्र दाखल केले.या निवडणुकीत आपला पराभव होईल,व तो आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला तो परवडणार नाही,हे लक्षात घेऊन शिंदे सरकारने विद्यापीठ सरकारवर दबाव टाकून या निवडणुका स्थगित करायला लावल्या होत्या.पण अभाविपने सरकारला ” घरचा आहेर,” दिल्यानंतर व प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर शिंदे सरकार खडबडून जागे झाले व या निवडणुका दोन दिवसांपूर्वी घेण्यात आल्या.या निवडणुकीचा लागलेला निकाल पाहता,शिंदे सरकारला जी भिती वाटत होती,ती खरी ठरली आहे.युवा सेनेने १० पैकी ९ जागा जिंकल्या व विद्यापीठावर आपले निर्विवाद वर्चस्व राखले.हे निकाल महायुतीसाठी धोक्याची घंटा असून यातून तरुणवर्गाचा कल कोणाकडे आहे,हे स्पष्ट झाले आहे.त्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच उमटणार आहेत.

