दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्याऐवजी खच्चीकरण केले,
गृहमंत्री अमित शहा यांनी विदर्भ,मराठवाडा व उ.महाराष्ट्र,या तीन विभागाचा नुकताच दौरा केला.या दौऱ्यात त्यांनी थेट स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.आजवर कधीही असं घडलं नव्हतं.त्यांनी या संवादातून कार्यकर्त्यांना प्राणवायू देण्याचा प्रयत्न केला.अचानकपणे अशाप्रकारची उपरती त्यांना का व्हावी ? या प्रश्नाचे उत्तर आहे,” लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव,” होय.४८ पैकी ४५ जागा जिंकणार,असे दिवास्वप्न पाहणाऱ्या अमित शहा व नरेंद्र मोदी यांना १७ जागांवर समाधान मानावे लागले.हा अनुभव लक्षात घेऊन तसेच त्याची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी अमित शहा यांनी आता अशाप्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत.पण त्यांच्या या प्रयत्नाला कितपत यश मिळेल,हे आजच्या घडीला सांगणे जरा कठीणच आहे.मात्र त्यांच्या अशा प्रयत्नाचा कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही.पदाधिकारी व कार्यकर्ते चार्ज होऊ शकले नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांच्या कार्यशैलीत बिलकुल साम्य नाही.मोदी हे टायमिंग साधत राजकारण करत असतात तर अमित शहा हे रस्त्यावरची लढाईच्या राजकरणात चाणक्य म्हणून ओळखले जातात.पण गेल्या लोकसभा निवडणुकीत या दोघांची रणनिती चालली नाही.या दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच जिंकणार,असे ठासून सांगितले,पण त्याचवेळी त्यांनी एक मोठी चूक केली.ते पुढे म्हणाले,राज्यात विरोधकाकडून होणाऱ्या आंदोलनाची काळजी करू नका,आपल्याला अशा आंदोलनाचा मोठा अनुभव आहे,अशी अनेक आंदोलने आपण आजवर चिरडली आहेत,असे सांगून त्यांनी गुजरातचे लेवा-पाटीदार व राजस्थानचे गुर्जर व जाट आंदोलनाची उदाहरणे दिली.त्यांच्या या वक्तव्याचे परिणाम त्यांना या निवडणुकीत भोगावे लागणार आहेत.आज राज्यात मराठा,ओबीसी,आदिवासी व धनगर समाज,आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे,अशावेळी जर आंदोलन चिरडण्याची भाषा ते करत असतील,तर या निवडणुकीत वेगळं काही होणार नाही. अशाप्रकारची आगलावू व भडकावू भाषणे होत असतील तर ती महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडतील.या दौऱ्यात अमित शहा यांनी आणखी एक चूक केली,त्यांनी ठाकरे व पवार यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखा,असे आवाहन केले.त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपला या दोघांचे किती भय वाटते,हे दिसून आले आहे.सैन्याचा सेनापती जेंव्हा धायकुतीला येतो व तो शस्त्रे खाली टाकतो,तेंव्हा त्याच्या सैनिकांचे मनोधैर्य खचते व त्यांची पळापळ सुरू होते.त्यामुळे शहा यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याऐवजी त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम,या दौऱ्यात केले,असे म्हंटल्यास ते वावगं ठरू नये.

