दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मतदार,सरकारच्या भुलभुलैय्यात अडकणार नाहीत,
राज्यात तीन इंजिनचे सरकार,सध्या पैश्याच्या खिरापती वाटण्यात मश्गुल असून,त्यांच्या या अशा वागण्याचा राज्याच्या तिजोरीवर किती भार पडत याच्याशी त्यांना कसलेही देणेघेणे नाही.आज या सत्तेसाठी बेफाम झालेल्या सरकारने राज्याची तिजोरी रिकामी करण्याचे पाप केले आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी विधानसभा जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अशी उधळपट्टी सुरू केली आहे.त्यांच्या या अशा वागण्यामुळे राज्याची विविध क्षेत्रात पीछेहाट सुरू झाली आहे.त्यामुळे राज्याची जनता त्यांना माफ करणार नाही.राज्यात विविध विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची हजारो कोटींची बिले गेल्या सहा महिन्यांपासून रखडली असून ठेकेदारांनी नवीन कामे सुरू करण्यास साफ नकार दिला आहे.तसेच त्यांच्या संघटनांनी आमची बिले मिळाली नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.अशी परिस्थिती निर्माण झाली असताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दररोज नवनवीन प्रकल्प जाहीर करत सुटले आहेत.त्यांची ही उड्डाणे ५० हजार कोटीच्या घरात असतात.वारेमाप घोषणा करण्याचे सत्र गेल्या तीन महिन्यापासून सतत सुरू आहे,पण त्या केवळ कागदावरच पाहायला मिळतात.
गेल्या सहा महिन्यांपासून सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळे हातखंडे वापरण्यास सुरुवात केली आहे,पण मतदारांच्या मनात वेगळेच काहीतरी चाललं आहे.आपल्या लाडक्या बहिणींना दरमहा १५००/- रु.देऊन या बहिणींचे संसार चालू शकत नाहीत,त्यांच्या हालअपेष्टा थांबू शकत नाहीत.जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.कोथंबीरची एक जुडी सध्या बाजारात ३९०/- रु.मिळते,प्रत्येक भाजी १५० ते २०० रु.किलो दराने विकण्यात येत आहे.काही महिन्यांपूर्वी तीन रु.दराने विकण्यात येणारी अंडी आता सहा रु.वर गेली आहेत.गोरगरीबाच्या रोजच्या जेवणात कडधान्यांचा आधार असतो,ती कडधान्येही आता त्यांना खरेदी करणे शक्य होत नाही.केंद्र सरकारने सगळ्या जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावल्यामुळे आज महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.या सरकारने मुलांच्या खाऊ पासून कफनपर्यंत काही सोडले नाही.प्रत्येक वस्तूवर जीएसटी लावण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे.त्यांना विरोध करण्याची हिंमत आपल्या राज्य सरकारमध्ये नाही.केंद्रीय स्तरावर दर सहा महिन्यांने होणाऱ्या जीएसटी परिषदेत मुख्यमंत्री व अर्थमंत्री मूग गिळून बसतात.कोरोनानंतर शाळांची भरमसाठ फी व विजेची बिले भरताना लोकांचे कंबरडे पार मोडून पडले आहे.एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे महागाई,अशा कात्रीत सापडलेले मतदार,सरकारच्या ” मुख्यमंत्री,लाडकी बहीण योजने,” च्या भुलभुलैय्यात फसतील,असे वाटत नाही.मुख्यमंत्री दररोज राज्यात नवनवीन रस्ते बांधणीचे प्रकल्प जाहीर करत असतात.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग,मुंबई-गोवा महामार्ग,भिवंडी-वाडा,
भिवंडी-वाडा,या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहवत नाही.नव्याने बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर दोन वर्षात खड्डे पडतात,हे राज्याचे सुजाण मतदार कधीही विसरणार नाहीत.तुम्ही खिरापती वाटत राहा,आम्ही तीचा जरूर स्विकारु,पण निवडणुकीत आम्ही आमची सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करू,अशा मताला राज्यातील जनता आली आहे.या सर्व परिस्थितीवरून राज्याला दिवाळखोरीच्या वाटेवर नेऊन ठेवणाऱ्या या तीन इंजिनच्या सरकारला मतदार आता दणका देण्याच्या तयारीत आहेत.

