दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पालघर विधानसभा ; भाजपमुळे शिंदे गटांच्या नेत्यांचे भवितव्य टांगणीला,
दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे गटात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैदेही वाढाण आता घरवापसीच्या मार्गावर आहेत.पण उद्धव ठाकरे त्यांना पक्षात पुन्हा घेतील,असे वाटत नाही.
गेली अनेक वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कट्टर समर्थक म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.पण अडीच वर्षांपूर्वी झालेल्या बंडाच्या वेळी त्यांनी शिंदे यांना साथ दिली.त्यामुळे उद्भव ठाकरे यांनी त्यावेळी चांगलाच संताप व्यक्त केला होता. मात्र गेल्या अडीच वर्षात वैदेही वाढाण यांची पक्षात साधी दखल घेतली गेली नाही.यंदा त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळेल,अशी अपेक्षा होती,पण त्यांना उमेदवारी देण्यास अनेकांचा विरोध आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची अनु.जाती व जमाती आयोगावर सदस्य म्हणून नियुक्ती करून त्यांचा पत्ता परस्पर कट केला आहे.त्यामुळे त्या पक्षावर प्रचंड नाराज झाल्या आहेत.या विधानसभा जागेवर भाजपने दावा केला असून ही जागा भाजपकडे गेल्यास माजी खा.राजेंद्र गावित यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे व्यथित झालेल्या वैदेही वाढाण आता घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.पण उद्धव ठाकरे त्यांना पक्षात प्रवेश देतील,अशी शक्यता आहे.त्यांच्या घरवापसी करण्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटात असलेली लॉबी आता सक्रिय झाली आहे.ही लॉबी त्यांना पुन्हा प्रवेश मिळू नये,यासाठी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहेत.कारण या विधानसभा मतदारसंघात भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात यावी,यासाठी तमाम शिवसैनिक आग्रही आहेत.तसेच भाजपमध्येही राजेंद्र गावित याना उमेदवारी देण्याविषयी प्रचंड नाराजी आहे,त्यामुळे ऐनवेळी भाजप माजी आ.विलास तरे यांना उभे करतील,अशी शक्यता आहे.पालघर विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा,यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण प्रचंड आग्रही आहेत.त्यांच्या या प्रयत्नात ते यशस्वी ठरले तर एकनाथ शिंदे गटातील तीन ते चार नेत्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागणार आहे.

