दीपक मोहिते,
सामाजिक भान,
सरकारची अवस्था ; धरलं तर चावत आणि सोडलं तर पळते,”
आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात जाती-धर्म व समाजा-समाजात भांडणे लावली,आज हीच भांडणे महायुतीच्या चांगलीच अंगलट आली आहेत.मराठा-ओबीसी व धनगर-आदिवासी आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.जाती-धर्मात आग लावल्यानंतर ती आटोक्यात आणणे,कदापी शक्य होत नाही.त्यामुळे आज आरक्षणाच्या प्रश्नावरून तीन इंजिन सरकारची प्रचंड दमछाक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अंतरवली सराटीमध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.तर त्याच्याविरोधात ओबीसी समाजाच्या नेत्यांनीही याच गावात उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे अंतरवाली-सराटीमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे.मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणातून आरक्षण देण्यात यावे,अशी मागणी जरांगे पाटलांनी लावून धरल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे,राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाचे नेते आता आक्रमक झाले आहेत.त्यांनी अंतरवली सराटीमध्येच उपोषण करण्याचे जाहीर केले आहे.सरकारने त्यास परवानगी देता कामा नये.कारण गावात तणाव निर्माण होऊ शकतो.दुसरीकडे धनगर समाजानेही याच प्रश्नावरून आंदोलन छेडले आहे.या समाजाच्या नेत्यानी आदिवासीच्या कोट्यातून आरक्षण मिळावे,अशी मागणी केली आहे.त्यामुळे आदिवासी समाजदेखील आक्रमक झाला असून सरकारने आमच्या आरक्षणाला हात लावू नये,असा इशारा दिला आहे.राज्यसरकारमधी काही शक्तींनी जाती-धर्म व समाजात तेढ निर्माण करून त्यांना एकमेकांसमोर उभे केले आहे.पण हा खेळ आता त्यांच्याच अंगाशी येऊ लागले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या चार समाजाच्या संघटना दिवसेंदिवस आक्रमक बनत चालल्या आहेत,ते अत्यंत धोकादायक असे आहे.अशा परिस्थितीमुळे सरकारची अवस्था आता ” धरलं तर चावत आणि सोडलं तर पळते,” अशी झाली आहे.

