दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” आधीच मर्कट,त्यामध्ये दारू प्यायले,”
काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून महायुतीच्या लोकांनी राज्यात जो काही धुमाकूळ घातला,त्याचा निषेध करावा,तेवढा थोडाच म्हणावा लागेल.राहुल गांधी यांनी मुलाखतीमध्ये आपले जे मत मांडले,त्याचे भाजपच्या आयटी सेलने ” कट अँड पेस्ट,” निती वापरून क्लिप व्हायरल केली.त्यानंतर आ.संजय गायकवाड व खा.अनिल बोंडे,यांनी एकामागोमाग अकलेचे तारे तोडले.ज्यांचे ” वरचे मजले रिकामे,” आहेत,अशा या दोन महाभागांची राजकीय वाटचाल अतिशय वादग्रस्त आहे.त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा करणे,म्हणजे स्वतःचे डोके दगडावर आपटून घेण्यासारखे आहे.
वास्तविक खा.राहुल गांधी यांनी मुलाखतीमध्ये मुलाखतकाराने विचारलेल्या प्रश्नाला अत्यंत अभ्यासपूर्ण व देशातील सामाजिक व्यवस्थेचे भान राखून उत्तर दिले होते.त्यांना मुलाखतकाराने “आपण देशातील आरक्षण बंद करणार आहात का ? ” असा प्रश्न विचारला असता,त्याला उत्तर देताना खा.गांधी म्हणाले,देशात जेव्हा पूर्णपणे समानता येईल,प्रत्येक समाजाला समान संधी मिळेल,तेंव्हा आरक्षण समाप्त होईल. त्यांचे हे उत्तर भाजपने मोडतोड करून व्हायरल केले व महायुतीच्या बिनडोक आमदार व खासदाराने ” आधीच मर्कट,त्यामध्ये दारू प्यायले,” त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडण्यास सुरुवात केली.त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मर्कटचाळांना ऊत आला.एकाने राहुल गांधी यांची जीभ छाटा आणि अकरा लाख घेऊन जा,असे फर्मान सोडले तर खा.अनिल बोंडे यांनी गांधी यांच्या जिभेला चटके द्या,अशी जाहीर मागणी केली.त्यांच्या या अशा आतताईपणावर ना मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडले ना उपमुख्यमंत्र्यांनी,या दोघांचे मौन बाळगणे व त्यांच्या पक्षांनी राज्यभर आंदोलन छेडणे,याचा अर्थ असा होतो की ज्या मर्कटचाळा या दोघांनी केल्या,त्याला वरिष्ठांचा छुपा पाठिंबा असला पाहिजे.

