दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप ; लोकमान्य टिळक स्वर्गात अश्रु ढाळत असतील,
हिंदू धर्मात गणेशोत्सव व शिवजयंती,या दोन उत्सवाला अनन्यसाधारण महत्व असून हे दोन्ही उत्सव गेल्या अनेक शतकापासून उत्साहात साजरा करण्यात येत असतो.आपली संस्कृती व धर्म,याविषयी प्रत्येक हिंदूंच्या मनात अस्मिता कायम जागृत असावी. तसेच आपापसातील मतभेद दूर सारून सर्व भारतीयांनी एकत्र यावे,अशी लोकमान्य टिळकांची इच्छा होती.त्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेचा जन्म झाला.स्वातंत्र्यपूर्व काळात पारतंत्र्यातील आपल्या बांधवांना संघटीत करावे व त्यांच्यामध्ये राष्ट्रीय अस्मिता जागृती करावा,असाही एक उद्देश होता.परंतु अलीकडच्या काळात लोकमान्यांनी सुरू केलेल्या या उत्सवाला हिडीस स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे.हल्ली लाडक्या बाप्पाला किती सोने व पैसे जमा होतात,यावर गणपतीचे महत्व ठरू लागले आहे.गल्लाभरू सार्वजनिक उत्सव मंडळाची संख्या बेसुमार वाढली आहे.
नवसाला हमखास पावणारा अमुक अमुक राजा,प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारा बाप्पा,असे मार्केटींग मोठ्याप्रमाणात करण्यात येत असते.अमाप पैसा व राजकारण्यांचे पाठबळ,यामुळे आपल्या राज्यात सार्वजनिक मंडळाचे अक्षरशः पीक आले आहे.आता तर या काळात मुलींना नाचवण्याचे हिडीस प्रकार सुरू झाले आहेत.त्यासाठी लागणारा बक्कळ पैसा हा वर्गणीतून नाहीतर वसुलीमधून उभा राहत असतो.त्यासाठी राजकारणी मंडळी आपल्या परिसरातील विकासक,व्यापारी,
दुकानदाराना वेठीस धरत असतात.ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात जनजागृती व्हावी,असा उद्देश उराशी बाळगून लोकमान्यांनी ही संकल्पना राबवली,अशा उपक्रमातून समाजप्रबोधन व्हावे,अशी त्यांची अपेक्षा होती.यामध्ये विविध विषयांवर व्याख्याने,विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा,महिला विषयक विविध उपक्रम व रोजगार व व्यावसायिक मार्गदर्शन,इ.चा समावेश असावा,असे अपेक्षित होते.पण सध्या डीजेचा धुमाकूळ,नाचणाऱ्या मुलींचा अंगविक्षेप,प्रचंड आरडाओरड,धक्काबुक्की व तरुणांचा दारू पिऊन होणारा थयथयाट,हे आता तुमच्या आमच्या पाचवीला पुजला आहे.गणेशाचे आगमन,हे पूर्वी लेझीम व परंपरागत नृत्ये यांच्या गजरात होत असे.आता ते नाशिकचा कच्ची बाजा व ढोल ताशांच्या गजरात होऊ लागले आहे.तसेच विसर्जन हे अत्यंत भावविवश वातावरणात होत असे,आता तेही नाचगाण्याच्या ठेक्यावर होऊ लागले आहे.पूर्वीकाळी विसर्जनाचा दिवस समीप आला की वातावरण बदलले जात असे,प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उदासी पाहायला मिळत असे,पण आता गणेश विसर्जनही इन्व्हेंट ठरू लागले आहे.विसर्जन हे गंभीर वातावरणात नाही तर जल्लोषात होऊ लागले आहे.त्यामुळे आपले सारे सण व उत्सवाना बीभत्स स्वरूप आले आहे.भविष्यात यामध्ये बदल होण्याची सुतराम शक्यता नाही.हे सारं पाहून लोकमान्य टिळक स्वर्गात नक्कीच अश्रू ढाळत असतील.मी ” याचसाठी केला होता अट्टाहास का ? ” असा प्रश्न ते स्वतःलाच विचारत असतील.

