दीपक मोहिते,
सरन्यायाधीशानी मौन सोडायला हवे,अन्यथा चौथा स्तंभही निखळून पडेल,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाण्यावरून देशभरात जो धुरळा उडाला होता,तो आता बराच खाली आला आहे.या प्रकरणी अनेक घटनातज्ञानी, पंतप्रधान व सरन्यायाधीशांनी लोकशाही मूल्ये जपली पाहिजेत,अशा शब्दात या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.आता हा गदारोळ संपत आला असला तरी या दोघांनी या प्रकरणी जे मौन बाळगले आहे,ते अत्यंत चिंताजनक तर आहेच पण आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारेही आहे.या दोघांपैकी एकाने तरी कोणी कोणाला बोलावले ? याविषयी खुलासा करणे,गरजेचे होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वभाव लक्षात घेता,ते कधीही खुलासा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.पण सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मौन बाळगणे,हे औचित्याला धरून नाही.
या सर्व घटनेमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड,हे वादात सापडले आहेत.त्यांच्याकडून न्यायधीशांसाठी असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे,असे कपिल सिब्बल,अशोक अरोरा व प्रशांत भूषण या ज्येष्ठ विधीतज्ञानी म्हंटले आहे.घटनातज्ञ उल्हास बापट यांनी पंतप्रधानानी सरन्यायाधीशांच्या घरी जाणे,ही चूकच असल्याचे म्हंटले आहे.कोणत्याही न्यायधीशाने आपल्या समोर असलेल्या खटल्यातील व्यक्तीशी संबंध ठेवता कामा नये,अशी न्यायाधीशांसाठी लागू असलेली आचारसंहिता सांगते.आज या सरन्यायाधीशांसमोर शिवसेना व राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या आमदार अपात्रततेचे व पक्षाची नावे व चिन्ह याविषयी खटले सुरू आहेत.या दोन्ही खटल्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप पक्ष देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे.त्यामुळे मोदी यांचे सरन्यायाधीशांच्या घरी जाणे,हे आचारसंहितेचे उल्लंघन आहेच,पण घटनात्मक औचित्यभंग देखील झाले आहे.देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर असलेल्या या दोघांनी काळजीपूर्वक व शिष्टाचाराला धरून वागायला हवे होते,अशी लोकभावना आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,हे विरोधकांना डीवचण्यासाठी अधून मधून असे इन्व्हेंट करत असतात,त्यांच्यासाठी तो राजकारणाचा एक भाग असतो.सत्तेत आल्या आल्या त्यांनी आपले विमान काबूलहुन थेट शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानात वळवले होते,तेथे त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातीच्या विवाहाला हजेरी लावली होती.हाही एक इन्व्हेंटचाच एक भाग होता.या माध्यमातून त्यांनी आपण किती साहसी आहोत,असे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.सरन्यायाधीश यांच्या निवासस्थानी भेट देणे,हा देखील एक इन्व्हेंटचा भाग आहे.मराठी पेहराव करून सरन्यायाधीशांच्या कुटुंबियासोबत आरती करताना व्हिडियो शूट करणे,व तो माध्यमांवर व्हायरल करणे,हे सारे नियोजनबद्धरित्या होणे,यामुळे जनतेमध्ये वेगळा संदेश गेला आहे,किंबहुना तो जाणूनबुजून पाठवला गेला आहे.पण सरन्यायाधीश सध्या जे मौन बाळगून आहेत,ते चुकीचे तर आहेच न्यायव्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडवणारा आहे.त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या प्रकरणी मौन सोडण्याची गरज आहे.
आपल्या संविधानाने लोकशाहीचे जे चार स्तंभ निश्चित केले आहेत,त्यापैकी तीन स्तंभ गेल्या दहा वर्षात एकामागोमाग निखळून पडले आहेत,जो एकमेव स्तंभ शिल्लक होता,त्या स्तंभाचा पाया देखील आता कमकुवत होत चालला आहे.

