दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
वसई विधानसभा ; कॉग्रेसच्या अनेकांचे गुडघ्याला बाशिंग,
महाविकास आघाडीमध्ये सध्या वसई विधानसभा मतदारसंघ ही जागा कोणी लढवायची यावरून शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मतैक्य होत नसल्याचे समोर आले आहे.आजच्या घडीला शिवसेनेकडे पण आ.हितेंद्र ठाकूर यांना टक्कर देईल,असा चेहरा नाही,तरीही त्यांनी या जागेचा हट्ट धरला आहे.पण ही जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडेच जाण्याची शक्यता अधिक आहे.
त्यांचे उमेदवार संभाव्य उमेदवार विजय पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे ७६ हजार ९५५ मते घेतली होती.तरीही आ.हितेंद्र ठाकूर यांच्याकडून त्यांचा २५ हजार ९९५ मतांनी पराभव झाला.या लढतीत आ.ठाकूर यांना १ लाख २ हजार ९५० मते मिळाली होती.त्यांना एकूण मतांपैकी ५४.१८ % तर विजय पाटील यांना ४०.०५ % मते पडली.तिसरे उमेदवार मनसेचे प्रफुल्ल ठाकूर यांना ३ हजार ५४० मते ( १.८६ % ) मिळाली व त्यांच्यावर अमानत रक्कम गमावण्याची नामुष्की आली.विजय पाटील यांना जी मते मिळाली,त्यामध्ये सर्वाधिक ख्रिस्ती मते होती.पण या निवडणुकीत ही मते पुन्हा आ.ठाकूर यांच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.ख्रिस्ती मते आजवर कधीही भाजपला मिळू शकली नाहीत.त्यामुळे ख्रिस्ती समाज कमळ फुलता कामा नये,यासाठी एकगठ्ठा मते विजय पाटील यांच्याऐवजी आ.ठाकूर याना देतील,अशी शक्यता आहे.काँग्रेसमध्ये आणखी काही उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.नाना पटोले यांचा एक समर्थक तर सोशल मिडियावर गेले वर्षभर ” छा गया है,” प्रेस नोट्सचा इतका भडिमार त्याच्याकडून होत आहे की विचारू नका. अधिकाऱ्यांना निवेदने देतानाचे फोटो तर दिवसागणिक अपलोड होत असतात.दुसऱ्या एका इच्छुकाला त्याच्या प्रभागाबाहेर कोणीही ओळखत नाही,तोही पृथ्वीराज बाबाच्या जीवावर उमेदवारी मिळावी,म्हणून सध्या टणाटण उड्या मारत आहे.हा इच्छुक नायगाव पुर्व भागात वेटलँड जमिनीवर अनधिकृत इमारती बांधणाऱ्या काही विकासकांच्या मागे हात धुवून लागला आहे.समजा आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपली आर्थिक बाजू कमी पडता कामा नये,यासाठी त्याची ही सारी धडपड सुरू आहे.तिसरा इच्छुक उमेदवार हा राज्यस्तरावरील नेत्यांशी नाही,तर थेट दिल्लीतील पक्षश्रेष्टीशी संधान बांधून आहे.२००९ च्या निवडणुकीत या महाशयाची अमानत रक्कम जप्त झाली होती.त्यावेळी शरद पवार व सोनिया गांधी यांनी अल्पसंख्यांक समाजाला संधी मिळावी,म्हणून ख्रिस्ती समाजाचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता.पण या उमेदवाराला बहुसंख्याकांसोबत ख्रिस्ती समाजाची मतेही मिळू शकली नाहीत.या निवडणुकीत विजयी झालेले अपक्ष उमेदवार विवेक पंडित याना ८१ हजार ३५८ मते मिळाली व ते विजयी झाले होते,त्यांना सरासरी ४८.३५ % मतदान झाले.त्यांचे प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार नारायण मानकर याना ६४ हजार ५६० मते ( ३८.५७ % ) तर तिसरे उमेदवार काँग्रेसचे ऍड.जिमी गोन्सालवीस यांना ८ हजार ६९५ मते ( ५.१७ % ) मते मिळाली. या निवडणुकीत आ.हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः उभे न राहता आपले विश्वासू सहकारी नारायण मानकर यांना उमेदवारी दिली होती.त्यावेळी झालेल्या लढतीत विवेक पंडित यांनी नारायण मानकर यांचा १६ हजार ७९८ मतांनी पराभव केला होता.मात्र त्यानंतर २०१४ मध्ये आ.हितेंद्र ठाकूर यांनी प्रचंड मते घेत आपल्या सहकाऱ्याच्या पराभवाचा वचपा काढला.

