दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
याला ” सबका साथ,सबका विकास,” म्हणायचं का ?
मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचे काम आता युद्धपातळीवर सुरु झाले आहे.दुसरीकडे बहुचर्चित वाढवण बंदराचे काम ही लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे.हे दोन्ही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी अनेक धनदांडग्यांनी या प्रकल्पाच्या परिसरातील गोरगरीब भूमीपुत्राच्या जमिनी मातीमोल भावाने खरेदी करण्याचा सपाटा लावला होता.आता या जमिनी सरकारने आपल्याकडून खरेदी कराव्यात,यासाठी ही मंडळी दिल्ली दरबारी येजा करत आहेत.मातीमोल भावाने खरेदी करण्यात आलेल्या या जमिनी हे लोक आता या प्रकल्पाना दामदुपट्टीने विकू पाहत आहेत.या गोरखधंद्यामध्ये सरकारी अधिकारीही सामील आहेत. बुलेट ट्रेन व वाढवण बंदर हे दोन्ही प्रकल्प ग्रामीण भागातील जनतेच्या उरावर उभारण्यात येत आहेत.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देशोधड़ीला लावून हे प्रकल्प राबवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी ताब्यात घेण्यात येत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये या प्रकल्पाविरोधात प्रचंड संताप आहे,पण ” सत्तेपुढे शहाणपण नाही,” या म्हणीनुसार स्थानिक भूमिपुत्र सारे काही सहन करत आहेत.
बुलेट ट्रेनची वास्तविक आपल्या देशाला खरंच गरज आहे का ? याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा होता.आज आपल्या देशातील अनेक शहरातील उपनगरीय रेल्वेसेवेची अवस्था कशी आहे ? यावर सरकारने एक नजर टाकायला हवी होती.ज्या बंदराला गुजरातने नकार दिला होता,तो प्रकल्प केंद्रसरकार आपल्या उरावर उभारत आहे. उपनगरीय रेल्वेने प्रवास करणारे लोक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात.त्यामुळे रेल्वेमंत्रालयाने आपल्या देशातील रेल्वेची सद्यस्थिती,होणारे अपघात,त्यामध्ये मृत्युमुखी पडणारे सर्वसामान्य प्रवाश्यांची वाढती संख्या, याकडे दुर्लक्ष करणे,हे मानवताविरोधी कृत्य,या सदरात मोडते.आज मुंबईकर प्रवासी कसे रेल्वेप्रवास करत असतात? हे मोदीनी आपल्या नजरेखालून घालावे.व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याऐवजी गोरगरीबांच्या जमिनी हड़प करुन बुलेट ट्रेन व वाढवण बंदर लादणे,हे न्यायाला धरून नाही.परंतु देशाला महासत्ता बनवण्याच्या स्वप्नात रमलेल्या या लोकाना सांगणार कोण ? देशातील काही मूठभर अपवाद वगळता,आपल्या देशातील रेल्वेस्थानकांची अवस्था,फलाटावरील अस्वच्छता,प्रशासनातील अनागोंदी कारभार,महिलांची सुरक्षितता इ.प्रश्न आपल्या सरकारला महत्वाचे वाटत नाहीत.केवळ निवडणुका जिंकण्यासाठी ” डाव मांडायचा,” हे असे किती दिवस चालणार ? देशाची जनता तुम्हाला माफ़ करणार नाही.अरे….कुठे नेवून ठेवलात आमचा देश…
बुलेट ट्रेन आम्हाला दोन घास मिळवून देणार नाहीत.अंबानी व अदानीची पोटे मात्र गलेलठ्ठ होणार आहेत,त्यानी दिलेली ढेकर पाहुन तुम्ही मात्र नक्कीच समाधानी व्हाल,याला आपण ” सबका साथ,सबका विकास,” म्हणणार का ?

