दीपक मोहिते,
महायुतीच्या गोटात घबराटीचे वातावरण,
प्रख्यात ” लोकपोल,” संस्थेचा निवडणूक पोल जाहीर,
काही मूठभर वृत्तवाहिन्यांचे सर्व्हे वगळता अनेक खाजगी संस्थांतर्फे करण्यात आलेले सर्व्हेचा रिपार्ट पाहून महायुतीच्या गोटात घबराट पसरली आहे.” लोकपोल,” ही या क्षेत्रात एक नावाजलेली संस्था असून या संस्थेने आजवर जाहीर केलेले सर्व्हे तंतोतंत खरे ठरले आहेत.कर्नाटक,पंजाब व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पोल ८५ ते ९० % खरे ठरले होते.या संस्थेने महाराष्ट्राच्या निवडणुकीचा पोल नुकताच जाहीर केला आहे.
त्यांच्या सर्व्हेनुसार या विधानसभा निवडणुकीत महायुतीची प्रचंड पीछेहाट होईल,असे स्पष्ट करत आकडेवारी जाहीर केली आहे.या सर्व्हेनुसार भाजपला विदर्भ,मराठवाडा व उ.महाराष्ट्रात जबर फटका बसेल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या विभागात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी व मराठा आरक्षण,हे दोन प्रश्न महायुतीला डोकेदुखी ठरतील,असे स्पष्टपणे म्हंटले आहे.या संस्थेच्या सर्व्हेक्षणातून विदर्भात एकूण ६२ जागांपैकी महायुतीला केवळ २० जागाच मिळू शकतील.उत्तर महाराष्ट्रात त्यांची मजल एकूण ४७ जागांपैकी २० ते २२ जागापर्यंत जाईल,असा अंदाज व्यक्त केला आहे.येथे कांदा उत्पादक शेतकरी महायुतीच्या सरकारवर प्रचंड नाराज आहेत.केंद्र सरकारच्या कांदे निर्याती दिशाहीन धोरणामुळे येथील शेतकरी उध्वस्त झाला आहे,त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला होता.ठाणे-कोकण विभागात मात्र महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा अधिक जागा मिळतील.येथे महायुतीला ३९ जागांपैकी २५ जागा मिळतील,असे चित्र आहे.मुंबई विभागात एकूण ३६ जागा आहेत,त्यापैकी महाविकास आघाडीला २२ ते २३ तर महायुती १२ ते १३ जागा जिंकू शकेल,अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.प.महाराष्ट्र विभागात एकूण ५८ जागा असून महाविकास आघाडी ३५ तर महायुती २१ ते २२ जागापर्यंत मजल मारू शकतील.मराठवाडा विभागात ४६ जागा असून येथे महाविकास आघाडी ३० तर महायुतीला १५ जागा मिळतील.
यासर्व्हेवरून महायुतीचे घोडदौड ही ११५ ते १२० पर्यंत असेल तर महाविकास आघाडी १६० ते १६५ आकडा गाठेल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शेती,बेरोजगारी,उद्योगधंदे परराज्यात जाणे,पीक विमा योजनेतील बजबजपुरी,मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्नी करण्यात आलेली फसवणूक,कायदा व सुव्यवस्थेची ढासळती परिस्थिती,बदलापूर बलात्कार व शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे,हिट अँड रन व विस्कळीत शिक्षण व्यवस्था,या सर्व घटना महायुतीच्या मुख्यमंत्री,” लाडकी बहीण,” योजनेला झाकून टाकणाऱ्या ठरणाऱ्या आहेत.

