दीपक मोहिते,
” निवडणूक वार्तापत्र,”
वसई/नालासोपारा विधानसभा ; भाजप-बविआ अशीच सरळ लढत होण्याची शक्यता,
वसई व नालासोपारा या दोन विधानसभा मतदारसंघात भाजप वगळता इतर राजकीय पक्षाची ताकद नगण्य असल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात भाजप-बविआ अशीच लढत होईल,अशी शक्यता आहे.अजित पवार व शरद पवार गटाचे अस्तित्व शून्य असल्यामुळे ते ही निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडणार नाहीत.यातालुक्यात अजित पवार गटाचे स्वयंघोषित एकमेव जिल्हाध्यक्ष वगळता सर्वत्र सामसुमच आहे.या पक्षाची या तालुक्यात पक्षाची बांधणीच झाली नाही.कारण पक्षाकडे दोन चार जण वगळता तंबू रिकामाच आहे.एकनाथ शिंदे गटाचे तीन शिलेदार आहेत,मात्र त्यांना जनमानसात फारसे स्थान नाही.या गटाकडे कार्यकर्त्याचा प्रचंड दुष्काळ आहे.त्यामुळे हा गट या दोन्ही निवडणुका लढवण्याबाबत अत्यंत उदासीन आहे.शरद पवार गटाकडेही एकही कार्यकर्ता नसल्यामुळे शरद पवार गट या दोन्ही जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) यांनी लढवाव्यात,यासाठी आग्रह धरेल,असे वाटते.वसई व नालासोपारा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना लोकांची प्रचंड सहानुभूती आहे.पण त्यांच्याकडे सक्षम नेतृत्व नाही.सध्या जिल्ह्याध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले हे मूळचे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते,पण त्यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत बिघडल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांचे बोट पकडले.लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवार भारती कामडी यांना भरघोस मदत केली,पण कामडी या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या.त्यामुळे त्यांच्याही मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.वसई तालुका हा एकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा गड होता,भाऊसाहेब वर्तक,तारामाई वर्तक यांच्या वर्तक घराण्याचे निर्विवाद वर्चस्व होते.पण १९९० च्या दशकात त्यांच्या वर्चस्वाला ओहोटी लागली व ठाकूर पर्वाला सुरुवात झाली.ठाकुरांचे वर्चस्व मोडून काढण्याचे गेल्या २५ वर्षात विरोधकांनी प्रचंड प्रयत्न केले,पण हितेंद्र ठाकूर यांच्या करिष्म्यापुढे ते सारे फोल ठरले.आजच्या घडीला काँग्रेसकडे सर्वाना सोबत घेऊन पक्ष बळकट करेल,असे नेतृत्व नाही.वसईची ही जागा त्यांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.पण त्यांच्याकडे प्रभावी उमेदवार नाही,त्यामुळे तिरंगी लढतीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहतील,असा अंदाज आहे.विजय पाटील,समीर वर्तक व ओनील आल्मेडा या तिघांची नांवे चर्चेत आहेत.पण या तिघांपैकी विजय पाटील हे आपली अनामत रक्कम वाचवू शकतील,उर्वरित दोघांना ते शक्य होणार नाही.त्यामुळे ही राजकीय परिस्थिती लक्षात घेता या दोन्ही मतदारसंघात भाजप व बहुजन विकास आघाडी अशी लढत होईल.मात्र आणखी एक शक्यता आहे,ती म्हणजे भाजप या दोन्ही जागा बहुजन विकास आघाडीला देईल,त्याबदल्यात ते बोईसर मागून घेतील,पण त्यांच्या या मागणीला आ.हितेंद्र ठाकूर धूप घालतील,असे वाटत नाही.कारण त्यांनी वसई पाचवेळा तर नालासोपारा व बोईसर त्यांनी सलग त्यांनी तीन वेळा जिंकल्या आहेत.त्यामुळे ते या तिन्ही जागांपैकी एकही जागा ते देणार नाहीत.महायुतीमध्ये सहयोगी पक्ष असूनही त्यांची भाजपशी मैत्रीपूर्ण लढती होतील,असा अंदाज आहे.

