दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सारं काही विस्मयजनकच
दोन दिवसांपूर्वी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गणपतीच्या निमित्ताने गेले होते.या घटनेमुळे देशभरात प्रचंड गदारोळ उठला.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आमंत्रण दिले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ” बिन बुलाये मेहमान,” त्यांच्याकडे गेले होते,हे यथावकाश कळेलच.आपले पंतप्रधान असेच एकदा पाकिस्तानचे नवाज शरीफ यांच्या घरी पोहोचले होते.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना आमंत्रण दिले होते की मोदी स्वतःहुन आले,हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याविषयी खुलासा करणे आवश्यक ठरते.त्यांच्या या भेटीवर घटनातज्ञ तसेच कायदेतज्ञानी आक्षेप घेतले आहेत.घटनातज्ञ बापट यांनी या दोघांची भेट,ही न्यायव्यवस्थेच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारी आहे असे स्पष्ट करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यांच्याकडे असलेल्या महाराष्ट्राच्या खटल्यातून स्वतःला वगळावे,अशी थेट मागणी केली आहे.भारतीय संविधानाने ज्या चार स्तंभावर लोकशाही व्यवस्था उभारली आहे,त्यामध्ये न्यायपालिका व सरकार या दोन महत्वाच्या स्तंभांचा समावेश आहे.त्यामुळे या दोन स्तंभामध्ये अंतर असायला हवे,असे अपेक्षित आहे.सरकारी कामानिमित्त अशा भेटी होणे,योग्य आहे.पण खाजगी भेट होणे,हे योग्य नाही,असे देशातील अनेक कायदेतज्ञाचे म्हणणे आहे.काही वर्षांपूर्वी तत्कालीन सरन्यायाधीश गोगोई यांची सरकारशी झालेली जवळीक व त्यानंतर त्यांचे राज्यसभेवर निवडून जाणे,या सर्व घडामोडी भारतीय जनतेच्या मनाला पटल्या नाहीत.राममंदिरचा खटला याच सरन्यायाधीश गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाकडे होता.या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर गोगोई खासदार झाले.या प्रकरणातही आमदारांची अपात्रता,पक्षाचे नाव व चिन्ह,हे दोन महत्वाचे खटले ज्या खंडपीठाकडे आहेत,त्यामध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा समावेश आहे.या खंडपीठासमोर असलेल्या या खटल्याचे सध्या तारीख पे तारीख,” असे सुरू आहे.राज्य विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे,त्यामुळे या दोन्ही खटल्यात आता ” राम,” उरलेला नाही.हा जो वेळकाढूपणा करण्यात आला,त्यामुळे विरोधी पक्षांनी आता निकालाची अपेक्षाही सोडून दिली आहे.अशा सर्व परिस्थितीमध्ये अशा भेटीमुळे संशय निर्माण झाला आहे,आणि ते साहजिकच आहे.

