दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
स्वतःला देव समजू नका – सरसंघचालक मोहन भागवत,
लोकसभा निवडणुकीनंतर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,या दोघांमध्ये असलेली दरी अधिक रुंदावत चालली आहे.गेल्या आठवड्यात संघाच्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले होते.या पूर्वी संघाचे मुखपत्र असलेल्या ” ऑब्झरर्व्हर,” मध्ये ” भाजपने केलेल्या चुकांमुळे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला,” असा लेख प्रसिद्ध झाला होता आणि त्यानंतर वादाला तोंड फुटले आहे.चार दिवसापूर्वी मोहन भागवत यांनी कोणीही स्वतःला देव समजू नये,असे आपल्या भाषणात सांगितले.त्यांचा रोख हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने होता,हे काही लपून राहिलेले नाही.
भाजप हा राजकीय पक्ष असला तरी तो संघाच्या मुशीतून जन्माला आला आहे.सुरुवातीला जनसंघ व १९८० मध्ये भाजप,अशी या पक्षाची वाटचाल राहिली.या पक्षावर संघाचा कायम वचक असायचा,पण संघ या काळात कधीही प्रसिद्धीच्या झोतात आलेला पाहायला मिळाला नाही.भाजपचे सूत्रसंचालन हे नागपूरच्या रेशीमबागेतून होत असे.२०१४ पर्यंत अशाप्रकारे काम चालत असे.२०१४ साली केंद्रात मोदी सरकार आले आणि संघ अधिक सक्रिय झाला.भाजपचे धोरण ठरवण्यात संघाचा हस्तक्षेप वाढत गेला.त्यानंतर २०१९ साली पुन्हा भाजप सत्तेत आला व भाजप-संघ यामध्ये दरी निर्माण होत गेली.सरसंघचालक मोहन भागवत अधिक आक्रमक झाले,भाजप सरकारच्या धोरणावर ते थेट टीका करू लागले.त्यांचे कार्यक्रम व भाषणाला माध्यमामध्ये अधिक प्रसिद्धी मिळू लागली.ती भाजपचे मोदी,शहा व नड्डा या त्रिकुटाला खटकू लागली.राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या जे.पी.नड्डा यांनी ” आम्हाला आता संघाची आवश्यकता नाही,” असे स्पष्ट करत,अंतर्गत असलेल्या धुसफुसीची वात पेटवली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सतत होणारे परदेश दौरे संघाला मान्य नाहीत,मोदी रशियाचे पुतीन,अमेरिकेच्या बायडेन,इस्रायलचे नेत्यान्याहू,दुबईचे राजे यांना भेटण्यासाठी वारंवार दौरे करतात,ते स्वतःला विश्वगुरू असल्याचे मानू लागले आहेत.देशाच्या ईशान्येस असलेले मणिपूर जळत असताना मोदी हे परदेशात ” मोदी,मोदी,” हर हर मोदी,घर घर मोदी,” ” मोदी है,तो मुमकीन है,” अशा ललकाऱ्या ऐकण्यात दंग आहेत,ते योग्य नाही,असे सरसंघचालक मोहन भागवत यांचे म्हणणे आहे.लोकांच्या प्राथमिक गरजा,महागाई,बेरोजगारी,शिक्षण व आरोग्य इ.ज्वलंत समस्या सोडवण्याचा प्रयत्न व्हायला हवेत,असे संघाचे म्हणणे आहे.स्वतःला देव किंवा सिद्धपुरुष म्हणवून घेण्यापेक्षा सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत,अशा शब्दात त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाने आपले विश्वासू सहकारी नितीन गडकरी यांना पाचारण केल्यामुळे स्थानिक नेत्यांचे धाबे दणाणले आहे.या सर्व घडामोडीमुळे मोदी व सरसंघचालक मोहन भागवत सुप्त अवस्थेत शीतयुद्ध सुरू झाल्याचे दिसून आले आहे.

