दीपक मोहिते,
” निवडणूक पूर्व विश्लेषण,”
….अन्यथा मातोश्रीवर कायम निवांत व्हावे लागेल,
देशात निवडणूक पूर्व सर्व्हेक्षण करणाऱ्या एका अग्रगण्य संस्थेचा सर्व्हे नुकताच जाहीर झाला आहे.या संस्थेने आजवर केलेल्या एकूण सर्व्हेपैकी ९० % सर्व्हे खरे ठरले आहेत.पंजाब,कर्नाटक,
तेलंगणा,
मध्यप्रदेश,राजस्थान व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक सर्व्हेचा त्यामध्ये समावेश आहे,हे आपण लक्षात घ्यायला हवे.आपल्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसणार आहे,असे त्यांचा सर्व्हे सांगतो.त्यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीला १५५ ते १६० तर महायुतीला ११५ ते १२० जागा मिळणार आहेत.कोकण-३९ व मुंबई-३६ अशा कोकण विभागातील ७५ जागा वगळता इतर ४ विभागात ( विदर्भ -६२,उ.महाराष्ट्र-४७,प.महाराष्ट्र-५८ व मराठवाडा-४६, ) महायुतीची पीछेहाट होईल,असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.त्यांचा हा निकाल जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे व अजित पवार गटाने प्रचाराची राळ उडवून दिली आहे.दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी पायाला भिंगरी लावून घरोघरी फिरू लागले आहेत.महाराष्ट्राच्या इतिहासात एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत,जे आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी स्वतः मतदारांचे उंबरठे झिजवत आहेत.दुसरीकडे अजित पवार यांनी एका सल्लागार कंपनीला ३०० कोटी रु.दिले असून त्यांच्या सल्ल्यानुसार तेही आता गुलाबी जॅकेट घालून महाराष्ट्रभर फिरू लागले आहेत.या कंपनीच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपला उर्मटपणा देखील बासनात गुंडाळून ठेवला आहे.पत्रकारांकडून विचारण्यात येणाऱ्या अडचणीच्या प्रश्नावर ” नो कॉमेंट्स,” सांगून उत्तर देणे टाळू लागले आहेत.या दोघांच्या तुलनेत भाजप अद्याप सक्रिय झालेला दिसत नाही.जागावाटपाचा तिढा प्रथम सुटू द्या,नंतर बघू,अशा भूमिकेत असणारा भाजप प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात धनशक्तीच्या बळावर ही जीवघेणी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.महाविकास आघाडीला या निवडणुकीत यश मिळेल,असा अंदाज असला तरी त्यांना गाफील राहून चालणार नाही.त्यांचे नेते शरद पवार हे महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढत आहेत.भाजप व अजित पवार गटात गेलेले अनेक आमदार आता पुन्हा पवारांकडे वळू लागले आहेत,हे त्यांचे व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे खरं कर्तृत्व आहे.या दोघांनी प.महाराष्ट्र,विदर्भ व उ.महाराष्ट्र या तीन विभागात चांगली मुसंडी मारली आहे.या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसही विदर्भ व मराठवाड्यात उत्तम कामगिरी करेल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पण या सर्व धामधुमीत उद्धव ठाकरे हे मात्र पुन्हा मातोश्रीवर ठाण मांडून बसले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती हल्ल्यामुळे महायुती चांगलीच घायाळ झाली होती.त्याचे चांगले परिणामही पाहायला मिळाले.शरद पवार यांचे राज्यभरातील दौरे व उद्धव ठाकरे यांचे घणाघाती हल्ले,अशा दुहेरी शस्त्राच्या वापरामुळे महायुतीची ” पळता भुई थोडी,” झाली होती.महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्रीपदाचे नांव जाहीर करत नाही,या एकमेव कारणामुळे नाराज झालेले उद्धव ठाकरे सध्या मातोश्री वर निवांत आराम करत आहेत.मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी मातोश्रीवर केलेला प्रदीर्घ आराम त्यांना किती भारी पडला,हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.हा अनुभव गाठीला असताना त्यांनी त्याची पुनरावृत्ती करणे,अत्यंत चुकीचे आहे.त्यामुळे आता जर मातोश्रीमधून बाहेर न पडल्यास,कायमचे मातोश्री वर निवांत होण्याची वेळ येऊ शकते,त्यामुळे त्यांनी आपला रुसवा दूर सारत बाहेर पडावे,

