दीपक मोहिते,
अजित पवार यांना झालंय तरी काय ?
अजित पवार यांना झालंय तरी काय ? धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री ही लवकरच शरद पवार गटात सामील होणार आहे.त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम यांचा संताप अनावर झाला आहे.आत्राम कुटूंबातील वाद शिगेला पोहोचला असताना अजित पवार यांनी दिलेला सल्ला ऐकून आपण सारे चकितच झालो आहोत.ते आत्राम यांच्या कन्येला सल्ला देताना म्हणाले,राजकारणासाठी स्वतःचे घर फोडू नका,ती चूक मी केली,त्याचे परिणाम मला भोगावे लागत आहे.मी केलेल्या चुकीचा मला प्रचंड पश्चाताप होत आहे.उशिरा का होईना,त्यांना पश्चाताप होतोय,हेही नसे थोडके….
स्वतःचे घर फोडताना,८५ वर्षे वयाच्या आपले वयोवृद्ध काका व ज्या बहिणीने आयुष्यभर आपल्यावर प्रेम केलं,त्या दोघांना आपण किती वेदना दिल्या,यांची जाणीव आता त्यांना होऊ लागली.ज्या बहीणेने आयुष्यभर हाताला राख्या बांधल्या,माझा रक्षणकर्ता भाऊराया म्हणून दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी मनोभावे ओवाळले,त्या बहिणीला पराभूत करण्यासाठी या कपटी भावाने पैशाचा पाट वाहीला,आज ते अजित पवार,आत्राम यांच्या कन्येला मानभावी सल्ला देत आहेत.हा काळाने उगवलेला सूडच म्हणावे लागेल.आपल्या करणीने त्यांनी राज्यात स्वतःची छीथू करून घेतली आहे.आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना उपरती झाली असून ते पश्चातापाची भाषा करत आहेत.पण ती देखील एक नौटंकी आहे.आता पश्चाताप करून काहीही होणार नाही.हिंदीत एक म्हण आहे,” अब पछतानेसे क्या फायदा,जब चिडीया चूभ गई खेत,” ज्या अजित पवारांनी स्वतःच्या बहिणीविरोधात कपट कारस्थाने केली,ते अजित पवार गुलाबी जॅकेट्स घालून राज्यात ” लाडक्या बहिणी,लाडक्या बहिणी,” असा सूर आळवत फिरत आहेत.त्यांचे ऊतू जाणारे प्रेम न ओळखण्याइतक्या या बहिणी वेड्या नाहीत.आत्राम यांच्या कन्येने त्यांना सांगायला हवं कि मला सल्ला देण्यापूर्वी तुम्ही स्वतःच्या गुलाबी जॅकेट्सच्या आता काय दडलंय ते आधी डोकावून पहा,आणि मग मला सल्ला द्या.”

