दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
अर्थखाते नालायक आहे,गुलाबराव पाटलांचा अजित पवारांवर घणाघाती हल्ला,
राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री यांनी गुलाबराव पाटील यांनी राज्याचे अर्थखाते किती नालायक आहे,यावर दोन दिवसांपूर्वी कडक शब्दात टीका केली होती.त्यांच्या या टिकेनंतर राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले.गुलाबराव यांनी जो संताप व्यक्त केला त्यास ८० % आमदाराकडून पाठिंबा मिळाला आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अर्थखाते व अर्थमंत्र्याबाबत गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो,ते योग्य तेच बोलले असे सांगत त्यांनी आघाडीचे सरकार असतानाही अर्थखात्याने मनमानी कारभार केल्याचा थेट आरोप केला.या दोघांचा रोख अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे होता.अडीच वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर घडून आले तेंव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात आमदारांना निधी देताना काय होत होते,यावर सविस्तर भाष्य करत अजित पवार लक्ष्य केले होते.त्यानंतर अजित पवार हे महायुतीत आले,मंत्रीपदे
वाटपात त्यांना अर्थखाते देण्यात येऊ नये,असा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वगळता अन्य पक्षाच्या आमदारांनी अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये,असा आग्रह देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला होता.पण अजित पवार यांच्या राजहट्टापुढे त्यांचे काडीमात्र चालले नाही,व ते पुन्हा या खात्यात विसावले.अर्थखात्याची सूत्रे हाती घेताच त्यांचे पुन्हा ” आपला तो बाब्या,दुसऱ्याचा तो कार्ट्या,” असा खेळ सुरू झाला.एकनाथ शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील,हे अत्यंत अभ्यासू, स्पष्टवक्तेपणा व अंगी प्रचंड आक्रमकता,असे गुण असणारे नेते म्हणून ओळखले जातात. सभागृहात ते बोलायला उभे राहिले कि सभागृहात पिनड्रॉप सायलेंस असतो.तसेच आमदार व मंत्री म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात केलेली विकासकामे ही वाखाणण्याजोगी आहेत.त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली खदखद,हे नक्कीच वास्तव असले पाहिजे.कदाचित त्यांच्या मुखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बोलले असावेत,अशी चर्चा राज्यात सर्वत्र होत आहे.बाळासाहेब थोरात यांनीही गुलाबराव पाटलाना साथ दिल्यामुळे अजित पवार यांचा चेहरा उघडा पडला आहे.

