दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्यसरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?
तीन इंजिनच्या सरकारने ” मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा,” या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्याची घोषणा केली आहे.या उपक्रमाचा पहिला टप्पा गेल्या जाने.२०२४ मध्ये पार पडला होता.दुसऱ्या टप्प्यास नुकतीच सुरुवात झाली आहे,हा टप्पा १५ सप्टें.पर्यंत सुरू राहणार आहे.
” भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा,” या योजनेंतर्गत आपल्या मुख्यमंत्र्यांनी ” मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा,” असा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.हा उपक्रम राबवण्यामागे विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करणे,क्रीडाविषयी जनजागृती करणे व शैक्षणिक वाढीला प्रोत्साहन देणे,अशी उद्दिष्टे आहेत.या उपक्रमांतर्गत सरकार ध्येय व धोरण अमलबजावणी-७४ गुण, पायाभूत सुविधा-३३ गुण व शैक्षणिक वाढ -४३ गुण अशा पद्धतीने शाळांचे गुणांकन करणार आहे.त्यासाठी सरकारने सुमारे ५० लाखाची बक्षिसे जाहीर केली आहेत.
सरकारच्या या योजनेला विरोध करण्याचे कारण नाही,पण असे उपक्रम राबवताना सरकारने ग्रामीण भागातील आपली शिक्षण व्यवस्था मृत्यूशय्येवर अखेरच्या घटका मोजत पडली आहे,हे वास्तव लक्षात घ्यायला हवे होते.जिल्हापरिषदेच्या हजारो शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडत आहेत,अनेक शाळांना पुरेसा शिक्षकवर्ग नाही, अनधिकृत शाळांचे आलेले अमाप पीक व खाजगी शाळांकडून होणारी लूट,या गैरप्रकारावर सरकारने सर्वप्रथम बडगा उचलायला हवा.पण या गैरप्रकाराकडे कानाडोळा करत सरकार नको ती उधळपट्टी करण्यात धन्यता मानत आहे.ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्याऐवजी सरकार स्वतः आता अनेक शाळा बंद करण्याच्या कामाला लागली आहे.अशी सर्व परिस्थिती असताना सरकार ” मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा,” उपक्रम राबवत आहे.हा उपक्रम राबवताना ” सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ” असे ग्रामीण भागातील जनतेने जर विचारले तर ते वावगे ठरू नये.

